कळंबेश्वर प्राथमिक आराेग्य केंद्रच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:29+5:302021-02-07T04:32:29+5:30
मेहकरः तालुक्यातील कळंबेश्वर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. नवीन इमारतीत स्थलांतरित हाेऊनही या ...
मेहकरः तालुक्यातील कळंबेश्वर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. नवीन इमारतीत स्थलांतरित हाेऊनही या प्राथमिक आराेग्य केंद्रात सहा महिन्यापासून एकही प्रसूती हाेऊ शकली नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड हाेत आहे.
कळंबेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नवीन इमारतीत सुरू झाला आहे. नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना काम करण्यास अडचणी जात आहेत. नवीन इमारतीमध्ये आवश्यक असलेले फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या सहा महिन्यापासून एकाही महिलेची प्रसूती झालेली नाही. कारण येथे प्रसूतिगृहासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण समोर आले आहे. बुधवारी मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, गटनेते राजू घनवट, कळबेश्वरचे विष्णू मगर यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता, अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. यामध्ये आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव, इमारतीमध्ये फर्निचरची कमतरता यामुळे सभापती यांनी तेथेच सर्व आरोग्य कर्मचारी यांना बोलावून सदर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये, अशा प्रकारचे नियोजन करावे. रुग्णांची कुठल्याही प्रकारची गैरसोय खपवून घेतल्या जाणार नाही, याकरिता तालुका आरोग्य अधिकारी यांनी लक्ष द्यावे.
निंबाजी पांडव, सभापती, पंचायत समिती
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. या ठिकाणी फर्निचरची व्यवस्था नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्या लवकरच दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. डी. एस. होणे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कळंबेश्वर.