खामगाव बाजार समितीचा कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 02:28 PM2020-01-24T14:28:19+5:302020-01-24T14:28:30+5:30
अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने तत्कालीन संचालक आणि कृउबासच्या प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: हिशोब पट्टी अप्रमाणित असल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १४ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष लेखापरिक्षण चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने तत्कालीन संचालक आणि कृउबासच्या प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
दृष्काळी परिस्थितीमुळे सन २०१६ या आर्थिक वर्षांसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (पणन संचालक) महाराष्ट्र शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकºयांना विशेष अनुदान जाहीर करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत आॅक्टोबर- नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत सोयाबीन विक्री करणाºया शेतकºयांसाठी प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. शासनाच्या या निर्णयानुसार खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री करणाºया सुमारे ३२ हजार शेतकºयांनी अनुदानासाठी अर्ज केले. यापैकी १६ हजार शेतकºयांना तातडीने अनुदानाचे वितरण करण्यात आले. मात्र, १४ हजार शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीची हिशोब पट्टी अप्रमाणित असल्याने अपात्र ठरले आहेत.
तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी!
अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकºयांना न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नंदलाल भट्टड यांनी २१ नाव्हेंबर २०१९ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बुलडाणा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हिशोब पट्टी घोळाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीतंर्गत चौकशी सुरू असून गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहे.
चौकशी पूर्ण होताच कृउबासच्या गलथान कारभाराचे लक्तरे वेशीवर टांगल्या जातील. काही अडत्यांना लाभ देण्यासाठी शेतकºयांना हानी पोहोचविण्यात आली आहे. कास्तकारांना मालाचा मोबदला कमी देऊन, अडत्यांकडून जादा भावाने सोयाबीन खरेदी करण्यात आली. शेतकºयांची मोठी आर्थिक पिळवणूक यामाध्यमातून झाली आहे.
- नंदलाल भट्टट, तक्रार कर्ते, खामगाव.
हिशोब पट्टी अप्रमाणित असल्यामुळे १४ हजारावर शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी व्यवहाराची चौकशी केली जात आहे. शेतकºयांना न्याय देण्यासाठी ही चौकशी तात्काळ पूर्ण केली जाईल.
- व्ही.पी.राठोड, विशेष लेखापरिक्षक वर्ग-२
सहकारी संस्था, फिरते पथक, बुलडाणा.