काेराेनामुळे १८ बालकांचा आधार हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 AM2021-06-01T04:25:48+5:302021-06-01T04:25:48+5:30
बुलडाणा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबच संपल्याचे चित्र आहे. काेराेना महामारीने ...
बुलडाणा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबच संपल्याचे चित्र आहे. काेराेना महामारीने बालकांनाही फटका बसला असून, जिल्ह्यातील १८ बालकांचा आधार हिरावला आहे. यामध्ये चार बालकांचे दाेन्ही पालक, तर १४ बालकांतील एका पालकाचे निधन झाले आहे.
कोरोना काळात जिल्हा कृती दलामार्फत एकूण १८ बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ०४ बालकांना आई-वडील नाहीत. या मध्ये २ मुली व २ मुलांचा समावेश आहे. १४ बालके ही कोरोनामुळे एक पालक झालेली आढळून आलेली आहेत, ज्या मध्ये ८ मुली व ६ मुले आढळून आलेली आहेत. या बालकांची प्राथमिक चौकशी सुरू असून, त्यांना बाल कल्याण समितीमार्फत पुढील पुनर्वसनासाठी हजर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे नातेवाईक आणि पालक यांचा रोजगार आणि व्यवसाय सुरळीत सुरू नसल्याने या बालकांना शिक्षण आणि उपजीविकेसाठी आर्थिक मदत लागणार असल्याचे कळाले आहे.
ज्या व्यक्ती व सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था आहेत, ज्यांना अशा बालकांना मदत करायची आहे, त्यांनी बालकांना परस्पर मदत न देता अशा संस्था किंवा व्यक्ती यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून अशा व्यक्ती किंवा संस्थांना बाल न्याय अधिनियमातील तरतुदीनुसार योग्य व्यक्ती किंवा संस्था म्हणून घोषित करण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संकटग्रस्त अशा बालकांची निवास गरजा, शिक्षण आणि मूलभूत गरजा व संपत्तीचे अधिकार आणि सर्वांगीण काळजी आणि संरक्षणासाठीची व्यवस्था बाल कल्याण समितीमार्फत होत असल्याने बालकांना परस्पर ताब्यात न घेता, त्याला बाल कल्याण समितीमार्फत पुनर्वसन सेवा देण्याचे आवाहन बालकांसाठी असणाऱ्या जिल्हा कृती दल आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
दत्तक घेण्याच्या पाेस्ट व्हायरल
कोविडच्या महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बेकायदेशीररीत्या दत्तक वा त्याच्या विक्रीच्या पोस्ट सध्या समाजमाध्यमातून व्हायरल होत आहेत. वस्तुतः असे मुलांना दत्तक घेता येत नाही. अशा प्रकारामध्ये काही दृष्टप्रवृत्ती असू शकतात. त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्हास्तरावर ० ते १८ वयोगटातील बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीची स्थापना बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या बालकांना मदतीची गरज आहे, त्यांनी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत घोषित करण्यात आलेल्या मदत क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.