शाळाबाह्य मुलांच्या शाेध माहिमेला काेराेनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:19+5:302021-03-10T04:34:19+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळाबाह्य मुलांच्या शाेध माेहीम सुरू हाेऊ शकलेली नाही. शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांची ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळाबाह्य मुलांच्या शाेध माेहीम सुरू हाेऊ शकलेली नाही. शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांची शाेध माेहीम राबवण्यासाठी नियाेजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधमोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १ ते १० मार्चपर्यंत शोधमोहीम सुरू करण्यात येणार हाेती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने तूर्तास ही मोहीम जिल्ह्यात सुरू झालेली नाही. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियम- २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम १० मार्चपर्यंत राबिवण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ३ ते १८ वयोगटांमध्ये विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असतील तर त्यांना या सर्वेक्षणामार्फत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या मोहिमेद्वारे प्रयत्न केले जातात. तीन ते सहा या वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने पार पाडण्यात येते. तर ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यामधील शिक्षकांच्या माध्यमातून सदर सर्वेक्षण पार पाडले जाते. वाड्या, वस्त्या, घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यात वाढत्या काेराेना संसर्गामुळे ही माेहीम सुरू हाेऊ शकलेली नाही.
काेराेना संसर्गाची भीती
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. जिल्ह्यात दरराेज ४०० पर्यंत काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. सुरुवातील काही शहरांमध्येच असलेला काेराेना आता गावपातळीवर पाेहोचला आहे. अनेक गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. त्यामुळे या गावांमध्ये प्रत्यक्ष घराेघरी जाऊन सर्वेक्षण केल्यास काेराेना संसर्ग पसरण्याची भीती आहेत. त्यामुळेच ही माेहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
काेराेना संसर्ग कमी झाल्यानंतर राबवणार माेहीम
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांचा शाेध घेण्यासाठी बैठक घेतलेली नाही. केवळ संबंधितांना शाळाबाह्य मुलांची शाेधमाेहीम राबवण्यासाठी नियाेजन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काेराेना संसर्ग कमी झाल्यानंतर शाळाबाह्य मुलांची शाेधमाेहीम सुरू करण्यात येणार आहे.