महिला कामगारांची कुचंबना !
By admin | Published: July 22, 2014 12:03 AM2014-07-22T00:03:32+5:302014-07-22T00:03:32+5:30
अनेक कार्यालयांत स्वच्छतागृहेच नाहीत
खामगाव : शासनाच्या महिला धोरणानुसार महिलांना कामाच्या ठिकाणी सर्व सुविधांसह स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे; मात्र शहरातील बहुतांश खासगी कार्यालयात, आस्थापनात स्वच्छता गृहेच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एमआयडीसीतील बहुतांश फॅक्टरीमध्ये महिलांची कुचंबना होत असल्याचे लोकमतच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. कामगार विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील महिला कर्मचारी आणि कामानिमित्त येणार्या महिला अभ्यागतांची संख्या फार मोठी असते; मात्र स्वच्छतागृहासारखी गरजेची सुविधासुद्धा अनेक ठिकाणी नसते. विशेष म्हणजे ही बाब शासनाच्यासुद्धा लक्षात आली. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने १९ जुलै रोजी तातडीने निर्णय घेत या निर्णयाच्या तीन महिन्याच्या आत पक्के स्वच्छतागृह बांधण्याचे तसेच तात्पुरती व्यवस्था म्हणून ४८ तासात टिनपत्र्यांची स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश दिले होते; मात्र सदर आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे तसेच अधिकार्यांना कल्पनासुद्धा नसल्याचे आज केलेल्या पाहणीत दिसून आले. बँकातही आर्थिक व्यवहारासाठी महिला मोठय़ा प्रमाणात येतात; मात्र या ठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याचे दिसून येते.