कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाची कास धरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:13 PM2017-10-09T20:13:42+5:302017-10-09T20:14:39+5:30
बुलडाणा : कीटकनाशकांमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शासन हादरले आहे. त्यामुळे आता फवारणी करताना तंत्रज्ञानाची कास करण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. याकरिता विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कीटकनाशकांमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शासन हादरले आहे. त्यामुळे आता फवारणी करताना तंत्रज्ञानाची कास करण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. याकरिता विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या आहेत.
कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फवारणी करणारी व्यक्ती पीक हंगामात दीर्घकाळ कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे सतत कीटकनाशकांच्या संपर्कात येते. पिकांमध्ये शेतमजुर दिवसभर फवारणी करीत असल्याचे दिसून येते. या व्यक्तींमध्ये त्वचेची अॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी प्रकारची लक्षणे दिसण्याची शक्यता असते. कीटकनाशक हाताळणी, साठवणूक व फवारणी करताना शेतकºयांनी काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दाटलेल्या पिकात फवारणी करताना एकेरी नोझल असलेला पंप वापरावा, नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, गढुळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात फवारणी करू नये, हातमोजे, मास्क, टोपी, पुर्ण पँट, गॉगल हे संरक्षण साहीत्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करू नये, किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार नाही याची काळजी घ्यावी, नाक, कान, डोळे व हात फवारणी होत असलेल्या औषधापासून संरक्षित राहतील, याची संपूर्ण काळजी घ्यावी, किटकनाशक यांच्या लेबलवरील सुचना समजून घ्याव्यात, गरजेनुसार व गरजे इतकेच द्रावण तयार करावे, दाणेदार प्रकारची औषधे तशीच वापरावीत, त्यांना पाण्यात विरघळू नये, स्प्रे पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार नाही याची काळजी घ्यावी, फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावे, फवारणी करताना खाणे,पिणे, धुम्रपान करणे, तंबाखू खाणे आदी प्रकार अजिबात करू नये, शिफारस केलेल्या तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.