खडकपूर्णा पाणीबचाव समितीचा देऊळगाव महीत रास्ता रोको; दोन तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:59 PM2019-02-05T16:59:14+5:302019-02-05T17:00:13+5:30
देऊळगाव मही: जालना जिल्ह्यातील ९२ गावांना खडकपूर्णावरून पाणी देऊ नये, या मागणीसाठी खडकपूर्णा पाणीबचाव समितीच्यावतीने देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील डिग्रस चौकात सकाळी ११ वाजात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला.
देऊळगाव मही: जालना जिल्ह्यातील ९२ गावांना खडकपूर्णावरून पाणी देऊ नये, या मागणीसाठी खडकपूर्णा पाणीबचाव समितीच्यावतीने देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील डिग्रस चौकात सकाळी ११ वाजात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या रास्ता रोकोमुळे चिखली-जालना मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. या रास्ता रोकोमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, गजेंद्र शिंगणे, प्रकाश गिते, बलराज देशमुख, गणेश शिंगणे, बबनराव चेके, जुलफेकर, मनोज कायंदे, संभाजी शिंगणे, एकनाथ काकड यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि परिसरातील शेतकरी वर्ग यात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. खडकपूर्णा प्रकल्पातून जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि जालना जिल्ह्यातील ९२ गावांना पाणी देण्यात येऊ नये. खडकपूर्णा प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या योजनेचे काम त्वरित बंद करण्यात यावे, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेण्यात येईल, असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी तथा पाणी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी दिली. खडकपूर्णा प्रकल्प गेल्या पाच वर्षापूर्वी पूर्णत्वास गेला. मात्र अद्याप याच भागातील शेतकर्यांना या पाण्याचा सिंचनासाठी लाभ झालेला नाही. बुलडाणा जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील काही गावांना आधीच या प्रकल्पावरून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करण्यात आले आहे. आता पुन्हा ९२ गावांसाठी येथून पाणी दिल्यास सिंचन क्षेत्रात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे खडकपूर्णा ऐवजी निम्न दुधना प्रकल्पातून या गावांना पाणी दिले जावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘खडकपूर्णा’ची लढाई अस्मितेची-तुपकर
‘खडकपूर्णा’ प्रकल्पाची लढाई ही बुलडाणा जिल्ह्यासाठी अस्मितेची लढाई आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाण्यावरून राजकारण करू नये, अन्यथा घराबाहेर फिरू देणार नाही, असा इशाराच यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलनादरम्यान आपल्या भाषणात दिला. सोबतच या योजनेचे काम त्वरित बंद कारवे, अशी मागणी करून प्रसंगी तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (वार्ताहर)