खडकपूर्णा, कोराडी प्रकल्प तहानलेलेच; दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:19 PM2019-08-07T12:19:32+5:302019-08-07T12:19:52+5:30
बुलडाणा: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस पडला असला तरी पलढग वगळता जिल्ह्याती अन्य ९० प्रकल्प अद्यापही तहानलेले आहेत.
बुलडाणा: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस पडला असला तरी पलढग वगळता जिल्ह्याती अन्य ९० प्रकल्प अद्यापही तहानलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे प्रकल्पातील जलसाठ्यांची माहिती घेतली असता मध्यम प्रकल्पात मोडणाºया कोराडी आणि तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात अद्यापही शुन्य टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ९१ प्रकल्पामध्ये अवघा १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दलघमीमध्ये विचार केल्यास तो ८८ दलघमी ऐवढाच आहे. जिल्ह्यातीची महत्तम पाणीसाठवण क्षमता ही ५३३.६ दलघमी असून त्याच्या तुलनेत फक्त १७ टक्केच पाणीसाठा प्रकल्पांमध्ये उपलब्ध असल्याने हे प्रकल्प भरण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. दुसरीकडे अडीच महिन्यानंतर उन्हाळ््यातील पाणी आरक्षणाचे नियोजन यंत्रणेला करावे लागणार आहे. त्यादृष्टीने वर्तमान स्थितीतील पाणीसाठा हा अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्याील ११ पालिका व दोन नगर पंचायतींसह दीडशे पेक्षा अधिक गावांची पाण्याची तहान ही जिल्ह्यातील या प्रकल्पांद्वारे भागविली जाते. त्यासाठी जवळपास ४० दलघमी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करावे लागत असते. गेल्या वर्षी प्रकल्पातच पाणी नसल्याने जवळपास ३० पेक्षा अधिक पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षणच करता आले नव्हते. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात येत्या दीड महिन्यात किमान वाढ होण्याची आस जिल्ह्याला लागून आहे. पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १२२.४३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा पावसाळ््यातच अवघा ८८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळातील नियोजनाकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागण्याचे संकेत मिळत आहेत.
मोठ्या प्रकल्पात दहा टक्के जलसाठा
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी मोताळा तालुक्यातील नळगंगा आणि मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पामध्ये वर्तमान स्थितीत सरासरी दहा टक्के जलसाठा उपलब्ध असून तो २३ दलघमी आहे. खडकपूर्णा प्रकल्पतर मृत पातळीच्याही खाली आहे. मध्यम प्रकल्पापैकी कोराडी प्रकल्पातही शुन्य टक्के पाणीसाठा असून अन्य सहा प्रकल्पामध्ये सरासरी २७ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पामध्ये १६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील काळातील नियोजनासाठी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा होण्याची गरज असून त्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत सरासरी ३५३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.