‘खडकपूर्णा’ पाच वक्र द्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:08 AM2020-08-01T11:08:15+5:302020-08-01T11:08:26+5:30
पाच वक्र द्वारातून ३,८०८ क्युसेक (१०८ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून जवळपास आठ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, ३१ जुलै रोजीही पाच वक्र द्वारातून ३,८०८ क्युसेक (१०८ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गेल्या २४ जुलै रोजी या प्रकल्पाची पाणी पातळी ही ७० टक्क्यांवर पोहोचली होती. त्यातच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. बुलडाणा, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३६ पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी ४५ हजार क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सलग ५६ तासांपेक्षा अधिक काळ या वेगाने तो होता. त्यानंतर प्रकल्पात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला; मात्र त्यानंतरही मर्यादीत स्वरुपात प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच होता.
खडकपूर्णा प्रकल्पाच्या मराठवाड्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस होत असल्याने प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात येत आहे.
आतापर्यंत जवळपास ६० दलघमीपाणी प्रकल्पातून नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे. त्याचा फायदा हा दुधना आणि येलदरी या मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांना झाला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी खडकपूर्णा नदीवर असलेले तीन कोल्हापुरी बंधारेही तुडूंब भरले आहेत.