खामगाव बाजार समितीत मालाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 03:02 PM2019-07-27T15:02:28+5:302019-07-27T15:02:35+5:30
बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
खामगाव : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण जिल्ह्यात अत्यल्प असले तरी दोन दिवसांपुर्वी आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी पीक व्यवस्थापनावर भर देत असून, शेतात फवारणी, डवरणीच्या कामांना वेग आला आहे. यामुळेच बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आजवर वार्षिक सरसरीच्या ३५ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात असला तरी शेतकरी पावसाबाबत आशावादी आहेत. पाऊस पुरेसा पडून पीक उत्पादन समाधानकारक होईल, या आशेने शेतकरी शेतात राबतच आहेत. जिल्ह्यात पंधरवाड्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे सुकत असलेल्या पिकांना आधार झाला. या पावसानंतर पिके तरली आहेत. आता दोन दिवसांच्या उघाडीनंतर शेती कामांना वेग देण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शेतीत डवरणी, फवारणी आणि खत देण्यासह निंदणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र शेत शिवारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरी ठेवलेला शेतमाल विकणे थांबविले आहे. त्याचा परिणाम बाजार समित्यांमधील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. खामगाव बाजार समितीत बुधवारी तूर, सोयाबीन आणि हरभरा मिळून केवळ ५६० क्विंटल शेतमालाची आवक झाली होती. मलकापूर बाजार समितीत भुईमुंग, उडीद, तूर, गहू, हरभरा आणि सोयाबीन मिळून ७५० क्विंटल शेतमालाची आवक झाली होती.
सर्वच ठिकाणच्या बाजार समितीत प्रत्येकी एक ते दीड क्विंटलपेक्षा कमीच शेतमालाची आवक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आता शेतकºयांकडे गतवर्षीच्या हंगामातील फारसा शेतमाल शिल्लकही राहिला नाही.
शेतमालाच्या भावात घसरण
शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक घटली असताना शेतमालाचे दरही सतत घसरत आहेत. तुरीला ५८०० रूपये प्रति क्विंटल असे समाधानकारक दर मिळत असले तरी गेले चार महिने तेजीत असलेल्या सोयाबीनसह हरभरा, भुईमुंग, मुग या शेतमालाच्या दरात मोठी घसरण होत आहे. सोयाबीनचे दर कमाल ३५०० रूपये प्रति क्विंटल, हरभºयाचे ४२०० रूपये प्रतिक्वंटल होते. हीच स्थिती इतरही शेतमालाच्या दराची असल्याचे बुधवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील लिलावाच्या प्रक्रियेदरम्यान दिसून आले.