खामगाव : पुनर्वसित दिवठाणा गावातील लाभार्थ्यांना घरकुलांची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:58 AM2020-10-21T11:58:47+5:302020-10-21T11:59:02+5:30
Khamgaon, Beneficiaries waiting for houses दोन वर्षांपासून येथील लाभार्थ्यांची घरकुलांचीही प्रतीक्षा कायम आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नमुना-८ अ प्रलंबित असल्यामुळे खामगाव तालुक्यातील दिवठाणा येथील पुनर्वसित दिवठाणा येथील लाभार्थ्यांची घरकुलं रखडली आहेत. परिणामी, येथील लाभार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असुविधांमुळे पुनर्वसित गावातील नागरिक आधीच त्रस्त झाले असताना गत दोन वर्षांपासून येथील लाभार्थ्यांची घरकुलांचीही प्रतीक्षा कायम आहे.
ज्ञानगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने खामगाव तालुक्यातील दिवठाणा या गावाचे पुनर्रवसन करण्यात आले. दिवठाणा येथील लाभार्थ्यांना काळेगाव रोडवर राहण्यासाठी भुखंड देण्यात आले. मात्र, या भुखंडाचा नमुना-८ अ रखडल्याने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून बांधून दिल्या जाणाऱ्या घरकुलांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन वर्षांपासून घरकुलांची प्रतीक्षा कायम असल्याने लाभार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची ही समस्या त्वरित मार्गी लावावी, अशी अेारड येथील नागरिक करीत आहे. प्रकल्प निर्मितीपासून याबाबत दुर्लक्ष झाले आहे.
गावात मुलभूत समस्यांचा अभाव आहे. पक्क्या घरकुलांऐवजी टिनाचे शेड उभारून दिले आहेत. मुलभूत सुविधांसह पक्के घरकुल मिळावे, अशी आपली मागणी आहे.
-विमल जाधव, लाभार्थी, पुनर्वसित दिवठाणा.
पक्के घरकुल नसल्याने अतिवृष्टी आणि वार उधाणाच्या कालावधीत घराबाहेर थांबावे लागते. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीचा लाभार्थ्यांना फटका बसतोय.
-शिवदास जाधव, लाभार्थी, पुनर्वसित दिवठाणा.
विशेष बाब म्हणून दिवठाणा येथील ७५ पेक्षा जास्त कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लाभार्थ्यांच्या घरकुलांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येतील. त्यादृष्टीने प्रशासन सकात्मक आहे. याबाबत लवकच मार्ग निघेल.
-एस.एस.पाटील,
शाखा अभियंता
पाटबंधारे विभाग, बुलडाणा.