खामगाव- चांगेफळ रस्ता कंत्राट रद्दची नोटिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:25 AM2021-06-28T11:25:51+5:302021-06-28T11:25:57+5:30
Khamgaon-Changephal road contract cancellation notice : आणखी पाच महिने त्या नोटिसवर कारवाई होण्यासाठी लागणार आहेत.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घाटाखालील तालुक्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या तसेच राज्य महामार्ग म्हणून असलेल्या खामगाव-चांगेफळ या रस्त्याचे काम कंत्राटदार कंपनी सुधीर कन्स्ट्रक्शन इंफ्रास्पेसने ही कामे बंद ठेवली असून त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने वाहनधारकांचा रोष त्या विभागावर येत आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटिस बांधकाम विभागाने बजावली असून आणखी पाच महिने त्या नोटिसवर कारवाई होण्यासाठी लागणार आहेत.
कंत्राटाच्या अटी व शर्तीमुळे हा प्रकार घडत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्यांची कामे करण्यासाठी सुधीर कन्स्ट्रक्शन इंफ्रास्पेस या कंत्राटदाराची नियुक्ती निविदेतून झाली. त्यामध्ये चांगेफळ-खामगाव या रस्ता कामासाठी २५ ऑक्टोबर २०१९ तर नांदुरा-मोताळा या कामासाठी ३० ऑक्टोबर २०१९ रोजी कंत्राटदारासोबत करारनामा झाला. २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. हायब्रीड अॅन्युइटी मोड नुसार या रस्ताकामाच्या अटी व शर्ती ठरलेल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या किमीचे टप्पे ठरले आहेत. त्या टप्प्यांची कामे ठरावीक कालावधीतच पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र, या दोन्ही रस्त्यांची कामे करारनाम्यानुसार पूर्ण न केल्याने कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिरंगाई केल्याने २२ जुलै २०२० पासून प्रतिदिन ६४ हजार रुपये वसुलीचा आदेश देण्यात आला.