खामगाव कृउबासमधील व्यापाऱ्यांचा बंद!
By admin | Published: July 4, 2017 12:09 AM2017-07-04T00:09:18+5:302017-07-04T00:09:18+5:30
जीएसटीबाबत संभ्रम : व्यापाऱ्यांमध्ये धास्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जीएसटी कर प्रणालीबाबत संभ्रम असल्याने येथील कृउबासमधील अडते व व्यापाऱ्यांनी सोमवारी व्यवहार न करता बंद पाळला. वेगवेगळे कर असणारी प्रणाली रद्द करत केंद्र सरकारने १ जुलैपासून देशात जीएसटी ही एक कर प्रणाली लागू केली.
याबाबत अद्याप पुरेपूर माहिती नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे, यामुळे येथील कृउबासमधील अडते व व्यापारी यांनी सोमवारी बंद पाळला. यामुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले होते. जीएसटी कर प्रणालीबाबत कृउबासच्या व्यापाऱ्यांसाठी दु.४ वा. सेमिनार आयोजित करण्यात आला होता.
या सेमिनारनंतर जीएसटीबाबतचे संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, सोमवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांसाठी सेमिनार आयोजित करण्यात आला. यावेळी अकोला येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
आॅनलाइन लॉटरी सेंटरधारकांचाही बंद
नव्याने लागू झालेल्या जीएसटी कर प्रणालीनुसार लॉटरीवर २८ टक्के कर लागला असून, हा कर ग्राहकांकडून वसूल न करता कंपनीने भरावा, या मागणीसाठी सोमवारी शहरातील आॅनलाइन लॉटरी सेंटरधारकांनी बंद पाळला. याआधी हा कर १८ टक्के इतका होता व तो कर कंपनी भरत होती; मात्र नव्या कर प्रणालीनुसार हा कर ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे. यानुसार १ हजार रुपयाची तिकीटे ग्राहकाने घेतल्यास त्याला १२८० रूपये द्यावे लागत आहे. यामुळे ग्राहक संख्या कमी होण्याची भीती निर्माण झाली असून, याविरोधात शहरातील २८ लॉटरी सेंटरधारकांनी बंद पाळला.