खामगाव: मुख्याधिकाऱ्यांचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून निरस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:32 PM2020-12-19T12:32:05+5:302020-12-19T12:32:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : येथील रॅलीज प्लॉट भागातील विनापरवानगी केलेले बांधकाम निष्कासित करण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी दिला. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील रॅलीज प्लॉट भागातील विनापरवानगी केलेले बांधकाम निष्कासित करण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी दिला. या आदेशानुसार पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले; मात्र तत्पूर्वीच बांधकाम मालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगनादेश मिळविला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
रॅलीज प्लॉट भागात इस्माईल हकीमोद्दीन बोहरा यांनी विनापरवानगी गोदामाचे बांधकाम केले. याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार झाली.
त्यानंतर विना परवानगी बांधकाम निष्कासित करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी आदेश दिला. त्यानुसार पालिकेचे पथक, जेसीबी आणि लवाजम्यासह घटनास्थळी पोहोचले; मात्र तत्पूर्वीच बांधकाम करणाऱ्या ईस्माईल हकीमोद्दीन बोहरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा स्थगनादेश नगरपालिका पथकाला दाखविला. त्यानंतर पालिकेचे पथक घटनास्थळावरून रिकाम्या हाताने परतले.
अडीच तास ताटकळत होते पथक!
विना परवानगी बांधकाम पाडण्यासाठी तब्बल अडीच तास पथकाला ताटकळत बसावे लागले. पालिकेचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच घटनास्थळी जेसीबी आणि मलबा उचलण्यासाठी ट्रॅक्टर पोहोचले होते.
त्यानंतर पथक प्रमुख अनुराग घिवे, पंकज काकड, आर. व्ही. देशमुख, सुभाष शेळके, अरुण चव्हाण, दीपक कदम, सुनील सोनोने, दुर्गासिंह ठाकूर, विक्की सारसार, विमल सारसर, अर्जन छापरवाल घटनास्थळी पोहोचले होते.