खामगाव-चिखली रस्त्यावर लागणार खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:22 AM2021-05-12T11:22:45+5:302021-05-12T11:23:02+5:30
Khamgaon-Chikhali road News : काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी झालेला खर्च वाहनधारकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी पथकर लावला जाईल.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव-चिखली या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांसाठी आता लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला आहे. तेथील मंजुरीनंतर या रस्त्यावर टोल वसुलीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
खामगाव-चिखली या ५६ किमीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी झालेला खर्च वाहनधारकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी पथकर लावला जाईल, या तत्त्वावरच ते काम झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयात सादर केला आहे. सोबतच या रस्त्यासाठी पथकर वसुलीचा संपूर्ण प्रस्तावही ऑगस्ट २०२० मध्ये पाठवला.
वाहनांच्या प्रकारानुसार पथकर
या रस्त्याने प्रवासी वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. तसेच मालवाहनांचे प्रमाणही मोठे आहे. त्या वाहनांच्या प्रकारानुसार पथकर वसूल केला जाणार आहे.
पथकर वसुलीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला जाईल. पथकर वसुलीची प्रक्रिया त्यांच्यामार्फतच होणार आहे.
- के.बी. दंडगव्हाळ,
अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला.