खामगाव : महिलेचा आयसोलेशन कक्षात उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 07:50 PM2020-04-10T19:50:01+5:302020-04-10T19:52:39+5:30
संदिग्धता नको म्हणून स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव : अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या एका गावातील ६३ वर्षीय महिलेचा खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेस दहा एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास खामगाव येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. संदिग्धता नको म्हणून या महिलेचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसाअगोदर शेतात काम करताना या महिलेच्या पाठीत चमक निघाली होती, अशी चर्चा आहे. त्यानंतर या महिलेस श्वसनास त्रास होत असल्याने तिला प्रारंभी लगतच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. दरम्यान, तेथून तिला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शुक्रवारी सकाळी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी १२:४० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या मृत महिलेचा स्वॅब नमुना हा नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. महिलेचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठलीही संदिग्धता नको म्हणून महिलेच्या पार्थिवावर अंत्यविधी करताना अनुषंगीक प्रोटोकॉलनुसार संपूर्ण काळजी घेण्यात आली असल्याची माहिती निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नीलेश टापरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)