खामगाव : घरकुलाच्या अर्जासाठी पैशांची मागणी; लाभार्थींच्या तक्रारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:28 AM2018-02-03T01:28:41+5:302018-02-03T01:28:52+5:30
खामगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात आल्याचे समजते.
अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात आल्याचे समजते. मुंबई येथील संस्थेची प्रकल्प विकास सल्लागार म्हणून नेमणूक झाली असून, सर्वेक्षण आणि लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी सर्वेक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यापैकीच काहींकडून ही मागणी केली जात असल्याची तक्रार आहे.
६ हजार अर्जांचे वितरण!
घरकुलासाठी शहरातील सहा हजाराच्यावर नागरिकांना अर्जांचे वितरण गेल्या महिनाभराच्या कालावधीत करण्यात आले आहेत. यापैकी साडेतीन हजार अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अर्जासाठी सर्वेक्षकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पालिकेचे प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र!
शहरातील विविध भागांचा सर्व्हे करून अर्ज भरून घेण्यासाठी सर्वेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने ६५ सर्वेक्षक नेमले असून, या सर्वेक्षकांकडून लाभार्थ्यांना अर्जासाठी १00 ते १५0 रुपयांची मागणी केली जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे सर्वेक्षकांच्या नावानिशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वेक्षक पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून संबंधित प्रकल्प विकास संस्थेस पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकल्प विकास संस्थेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
लाभासाठी अर्ज नि:शुल्क आहेत. अर्जासाठी कुणासही पैसे न देता, यासंदर्भातील तक्रारीसाठी थेट मुख्याधिकार्यांनी संपर्क साधावा. या प्रकाराची चौकशी करण्यात येईल.
- धनंजय बोरीकर
मुख्याधिकारी, खामगाव
लाभार्थ्यांनी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. सर्वेक्षकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे.
- शोभाताई रोहणकार
बांधकाम सभापती, नगर परिषद, खामगाव.