खामगाव : सिंचन विहीर वाटपात ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:11 AM2018-02-06T01:11:55+5:302018-02-06T01:13:12+5:30
भालेगाव बाजार : खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या भालेगाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २0१५ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहीर घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक देवचे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार सुनील पाटील यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भालेगाव बाजार : खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या भालेगाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २0१५ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहीर घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक देवचे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार सुनील पाटील यांनी दिले आहेत.
याठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारावर बोगस लाभार्थ्यांची निवड करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरुन तहसीलदारांनी चौकशी करून हा निर्णय दिला.
२0१५ मध्ये गावामध्ये १४ विहिरी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झाल्या होत्या. त्या विहिरीचे खोदकाम व बांधकामसुद्धा पूर्ण झाले. त्यापोटी लाभार्थ्यांना जवळपास ४२ लाख रुपये मिळाले; परंतु सदर विहिरी या बोगस लाभार्थ्यांना दिल्याची तक्रार रामेश्वर वि.बेलोकार यांनी ८ ऑगस्ट २0१७ रोजी केली. यामध्ये बळीराम तु. बेलोकार यांनी विहिरींसाठी खोटे कागदपत्रे दिल्याचा पुरावा दिला. तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सुनील पाटील यांनी ८ ऑगस्ट २0१८ रोजी घटनास्थळी जावून चौकशी केली.
यामध्ये ग्रामसेवक देवचे यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले. १५ ऑक्टोबर २0१५ रोजीच्या ग्रामसभेमध्ये बळीराम तु.बेलोकार व देवकाबाई बेलोकार हे पती-पत्नी एकाच कुटुंबातील असतानाही त्यांना आर्थिक लाभ पुरविण्याच्या हेतूने नियमांचे उल्लंघन करीत फसवणूक केली. देवचे अनेक प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरले असतानासुद्धा त्यांच्याकडून भालेगाव येथील प्रभार काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.