शौचालय योजनेचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 12:20 PM2020-11-17T12:20:16+5:302020-11-17T12:20:41+5:30
Khamgaon News तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात हागणदारीला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने स्वच्छता अभियानासारख्या विविध योजना राबविल्या. शौचालय बांधकामास अनुदान दिले. मात्र, त्यानंतरही अनेक नागरीक उघड्यावर शौचास जात आहेत. परिणामी तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागात सर्रास ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहे. सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवते. शासनाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून नागरिकांना प्रोत्साहनावर अनुदान दिले. त्यात वेळोवेळी वाढ केली. त्यामुळे गावात शौचालयांची संख्या वाढली. मात्र ग्रामीण भागात अनेक कुटुंबियांत शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते. आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचालय करतात, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले.
या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी म्हणून केंद्र शासनाने २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्राम योजना सुरू केली. त्याची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. यामुळे ग्रामीण भागात हगणदारी काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. यात शौचालय बांधकाम करणाºयांना अनुदान दिले जाते. मात्र ग्रामीण भागात नागरिक शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात करीत नसल्याने अनेक गावाच्या स्थितीवरून दिसते. ग्रामीण भागात गावांमध्ये प्रवेश करताना नाकाला रुमाल लावावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.