खामगाव : फटाका विक्रीत यंदा ४० टक्के घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 04:11 PM2020-11-18T16:11:31+5:302020-11-18T16:11:40+5:30
Khamgaon Firecracker News फटाक्यांचे दर गतवर्षी पेक्षा १५ ते २० टक्के महागल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना संसर्गाची भीती, फटाक्यांमुळे हवेत पसरणारे प्रदूषण आणि आरोग्यासाठी धोकादायक बाबी लक्षात घेता राज्य शासनाने फटाके विक्रीला दिवाळी सणाच्या सात दिवस आधी परवानगी दिली. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे फटाके विक्रीत ४० टक्के घट झाल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.
शहर, ग्रामीण अशा दोन भागांत फटाके विक्रीसाठी पोलिसांकडून परवानगी दिली जाते. स्थायी, अस्थायी असे परवानेधारक आहेत. खामगाव शहरात ४० ते ४५ स्थायी फटाका विक्री परवानाधारक आहेत. ग्रामीण भागात ही संख्या मोठी आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्ग आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे फटाके विक्रीत ४० टक्क्यांनी घसरण आली आहे. नोकरदार, व्यावसायीक आदींनी फटाक्यांच्या आतषबाजीकडे पाठ फिरविल्याचे विक्रीहून दिसून आले. शहरातील फटाका विक्री दुकानांवर गर्दी नव्हती. त्यातच फटाक्यांचे दर गतवर्षी पेक्षा १५ ते २० टक्के महागल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ५० टक्केच फटाके विक्रीसाठी आणले. त्यातील ३० टक्केच विक्री झाली.