खामगाव : पालिका मैदानाला प्लास्टिक कचऱ्याचा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:00 PM2018-11-10T18:00:13+5:302018-11-10T18:00:56+5:30
खामगाव : स्थानिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान गेल्या दोन दिवसांपासून प्लास्टिक कचºयाच्या विळख्यात सापडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान गेल्या दोन दिवसांपासून प्लास्टिक कचºयाच्या विळख्यात सापडले आहे. प्लास्टिक बंदी असतानाही या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा खच पडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवºयात सापडली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालिका प्रशासनाकडून नगर पालिका मैदानावर अस्थायी स्वरूपात फटाका मार्केट तयार करण्यात आले. दीपावलीनंतर अत्यल्प प्रतिसादामुळे फटाका व्यावसायिकांनी या ठिकाणाहून दुकाने हटविली. मात्र, दुकाने हटविल्यानंतर फटाका व्यावसायिकांकडून कचरा उचलण्यात आला नाही. याकडे पालिका प्रशासनानेही अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पालिका मैदानाला प्लास्टिक कचºयाचा कमालिचा विळखा पडला आहे. प्लास्टिक बंदीच्या काळातही मोठ्याप्रमाणात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर फटाक्यांच्या वेस्टनासाठी झाला. तसेच फटाक्यांची ने-आण करण्यासाठीही प्लास्टिकचाच वापर करण्यात आला. परिमाणी, मैदानावर मोठ्याप्रमाणात कचरा साचला आहे. प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच, स्वच्छ भारत अभियानालाही हरताळ फासल्या जात आहे. मात्र, याविरोधात पालिका प्रशासन हेतू पुरस्परपणे गप्प बसल्याचे दिसून येते.
फटाक्यांच्या दुकानांमुळे मैदान अस्वच्छ!
फटाक्यांच्या वेष्टनासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिकचा कचरा व्यावसायिकांकडून तसाच सोडून देण्यात आला. पालिका प्रशासनाकडूनही या मैदानाची स्वच्छता करण्यात आली नाही. परिणामी, मैदानावर कमालिची अस्वच्छता पसरली आहे. यामध्ये कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून येते.