मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा विक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:17 PM2018-04-25T14:17:54+5:302018-04-25T14:26:25+5:30
मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा खामगावअनोखा विक्रम खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांनी केला आहे.
खामगाव : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा अनोखा विक्रम खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांनी केला आहे. साची अग्रवाल नामक मुलीचे आधार कार्ड काढताना, उस्मानाबाद येथील यापूर्वी सहा मिनीटांत आधार कार्ड काढण्याचा रेकॉर्ड मोडीत निघाल्याचे अधोरेखीत झाले आहे.
खामगाव येथील आकाश अग्रवाल यांच्या पत्नी सौ. शिल्पा अग्रवाल यांना प्रसुतीसाठी जलंब रोडवरील एका हॉस्पीटलमध्ये १८ एप्रिल २०१८ रोजी पहाटे ५:३० वाजता भरती करण्यात आले. सकाळी ०८ वाजून ०७ मिनीटांनी मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. ही नोंदणी केल्यानंतर अग्रवाल यांच्या साची नामक अपत्याला १ मिनीट ४८ सेंकदात आधार कार्ड मिळाले आहे. यापूर्वी जन्मानंतर सहा मिनीटांमध्ये आधार कार्ड काढण्याचा विक्रम उस्मानाबाद येथील भावना संतोष जाधव या मुलीच्या नावावर असून, उस्मानाबाद येथील संतोष जाधव व्यक्तीने आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर सहा मिनीटांमध्ये आधार कार्ड काढल्याचे उस्मानाबाचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गेम यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मुलीच्या जन्मानंतर खामगाव येथील आकाश अग्रवाल यांनी त्यांच्या साची नामक मुलीचे आधारकार्ड अवघ्या १ मिनीट ४८ सेकंदात काढून विक्रम नोंदविला आहे. साची अग्रवाल हिला यूनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी आॅफ इंडिया (यूआयडीएआय) कडून आॅनलाईन आधार क्रमांक मिळाला असून, तिचा आधार क्रमांक ३०७४ ५५८९ ७८५२ असा आहे. तथापि, या आनंददायी घटनेमुळे खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांमध्ये मुलीच्या जन्मासोबतच आधार कार्ड नोंदणीत विक्रमाचा दुहेरी आनंद असल्याचे दिसून येते.
ताबडतोब मिळाले आधारकार्ड!
जन्मानंतर अवघ्या पावणेदोन मिनिटांमध्ये आधार कार्डासाठी नोंदणी करणाºया साचीला यूआयडीएआयकडून त्वरीत आधारकार्ड देण्यात आले आहे. जन्माला येताच मुलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातल्यामुळे अग्रवाल कुटुंबियांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
मित्र आणि तहसीलदारांची मदत!
नवजात साचीचे आधार कार्ड काढताना मनिष अग्रवाल यांना त्यांचे मित्र परेश खत्री, शशी गिरी यांची मदत लाभली. तसेच तहसीलदार सुनील पाटील यांना माहिती दिल्यानंतर ते देखील हॉस्पीटलमध्ये पोहोचले होते. दरम्यान, डॉ अरविंद पाटील यांचीही याकामी मोलाची मदत झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मुलीच्या जन्मानंतर तिचे आधार कार्ड बनविले. साचीचे आधारकार्ड बनविताना विक्रम होईल अशी कोणतीही मनिषा बाळगली नव्हती. मात्र, कमी वेळात तिचे आधारकार्ड बनल्याचा मनस्वी आनंद आहे. प्रत्येकाने आपल्यासोबतच आपल्या पाल्याचेही आधारकार्ड ताबडतोब बनवावे, एवढीच अपेक्षा आहे.
- मनीष अग्रवाल, खामगाव.