खामगाव : पूजा उद्योगाच्या ‘गोवर्या’ तेजीत; ऑनलाइन बुकिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:21 AM2018-02-20T02:21:33+5:302018-02-20T02:21:39+5:30
खामगाव: हॉटेल व्यवसायात गोवर्यांचा वापर वाढला असतानाच, गोवर्यांना पूजा उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मोठय़ा शहरांमध्ये गोवर्यांची ऑनलाइन बुकिंगही होत आहे. परिणामी, रानातील गोवर्यांही आता भाव खात असल्याचे दिसून येते.
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: हॉटेल व्यवसायात गोवर्यांचा वापर वाढला असतानाच, गोवर्यांना पूजा उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मोठय़ा शहरांमध्ये गोवर्यांची ऑनलाइन बुकिंगही होत आहे. परिणामी, रानातील गोवर्यांही आता भाव खात असल्याचे दिसून येते.
जनावरांच्या शेणाचे महत्त्व ग्रामीण भागात अबाधित असले तरी, शहरी भागात वाळलेल्या गोवर्यांची मागणी वाढली आहे. हॉटेलमध्ये जेवण रुचकर करण्यासाठी चुलीवरील विविध पदार्थांसोबतच रान गोवर्यांमधील रोडग्यांचे चलन वाढले आहे.
ग्रामीण परिसरातील तसेच जंगलातून वेचून आणलेल्या गोवर्यांची शहरात विक्री केली जाते; मात्र दिवसभर राबराब राबल्यानंतर वेचलेल्या गोवर्यांच्या पोतडीला अपेक्षित भाव मिळत नाही; परंतु शेतात काम करून मिळालेल्या मजुरीपेक्षा स्वतंत्रपणे गोवर्या वेचून मिळणारा रोजगार अधिक असल्याचे गोवरी विक्रेत्या शेवंताबाई कर्हाडे यांनी सांगितले.
ऑनलाइन विक्री!
ऑनलाइन पद्धतीने काही नामांकित वेबसाइटवर शेणाच्या गोवर्यांचा व्यापार होत आहे. परिणामी, गोवर्यांचे भाव वधारले आहेत. यामध्ये हाताने थापलेल्या गोवर्यांपेक्षा रानातील गोवर्यांना अधिक मागणी आहे. शहरी भागातील तुटवडा लक्षात घेता, ग्रामीण भागातूनच शेणाच्या गोवर्यांचा पुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागातून खरेदी केलेल्या गोवर्या मोठय़ा शहरांमध्ये आणि मोठय़ा शहरांमधून या गोवर्यांची ऑनलाइन विक्री केली जात आहे.
होम-हवनातही उपयोग!
गायीच्या शेणाच्या गोवरीचा होम-हवन आणि धार्मिक विधीसाठी उपयोग केला जातो. रथसप्तमीला या गोवर्यांचे विशेष महत्त्व असते. परिणामी, धार्मिक उत्सव काळात तसेच रथसप्तमीला गायीच्या शेणाच्या गोवर्यांची विक्री वाढते. त्याचप्रमाणे वीटभट्टीच्या उद्योगातही गोवर्यांचा वापर केल्या जातो. त्यामुळे दिवाळीनंतर गोवर्यांच्या व्यवसायाला तेजी येते. शेतातील गोवर्यांसोबतच हाताने थापलेल्या गोवर्यांचीही आता विक्री वाढत आहे.
हॉटेल व्यवसायातही वापर!
हॉटेलच्या गुणवैशिष्ट्यात वाढ करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये नावीन्यपूर्ण मेनूमध्ये चुलीवरच्या खाद्यपदार्थांचा वापर वाढला आहे. यामध्ये रान गोवर्यांमध्ये भाजलेले रोडगे हॉटेलचा आता विशेष मेनू बनले आहेत. त्यामुळे हॉटेल संचालकांकडून शेणाच्या गोवर्यांना वाढती मागणी आहे. रान गोवर्या या ग्रामीण भागातच उपलब्ध होतात. परिणामी, या गोवर्यांमुळे ग्रामीण भागातील महिला आणि नागरिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे.
ग्राहकांचा बदलता ‘ट्रेन्ड’ पाहता हॉटेलच्या जेवणाचेही स्वरूप बदलत चालले आहे. रान गोवर्यांमध्ये भाजलेल्या रोडग्यांना मोठी मागणी आहे. व्यक्तिगत ग्राहकांसोबतच महाप्रसादातही या मेनूचा वापर होत असल्याने, आम्ही ग्रामीण भागातून रान गोवर्या खरेदी करतो. ४0-५0 रुपयांना एक लहान (सिमेंटची) पोतडी मिळते.
- विनोद खराटे, हॉटेल व्यावसायिक, खामगाव.