खामगाव-जालना महामार्गाचे काम संथगतीने; नागरिकांनी केले ‘रास्ता रोको’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:11 PM2019-07-30T14:11:42+5:302019-07-30T14:11:49+5:30
मेहकर फाटा ते खामगाव चौफुलीपर्यंतचा रस्ता खोदून ठेवला असून त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने रहदारी जिकरीची झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : खामगांव-जालना या महामार्गाचे गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. याअंतर्गत शहरातील मेहकर फाटा ते खामगाव चौफुलीपर्यंतचा रस्ता खोदून ठेवला असून त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने रहदारी जिकरीची झाली आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील नागरिकांनी २९ जुलै रोजी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
रस्ता चौपदीकरणाच्या कामासाठी खामगाव-जालना हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. मात्र, या मार्गाचे अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने हा मृत्यूचा महामार्ग म्हणून कुपरिचीत झाला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र रस्तेजोड प्रकल्प कार्यान्वीत होत असताना खामगांव-जालना महामार्गाचे रखडलेले काम तिसऱ्यावेळी जाणत्या सरकारच्या काळात झपाट्याने परिपूर्ण होत आहे, मात्र काही अर्थपुर्ण बाबींच्या आड खामगांव चौफुली ते मेहकर फाटा पर्यंतच्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून थांबविण्यात आले होते. सर्वतोपरी सहकार्याच्या भूमिकेतून फेब्रुवारीपासून या रस्त्याचे काम पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आले, परंतु कधी तांत्रीक बाबींमुळे तर कधी अपुºया मनुष्यबळामुळे या रस्त्याचे काम अगदी कासवगतीने सुरु आहे. उखडलेला रस्ता आणि त्यातच पावसाची संततधार या मुळे रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. लहानमोठी सर्वच वाहने स्लीप होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत आंदोलनाची भूमिका घेत चिखली शहरातील नागरिकांसह भाजपचे युवा नेते कुणाल बोंद्रे व न. प. पदाधिकाऱ्यांनी २९ जुलै रोजी स्थानिक रेणुका पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा यावेळी दिला. या आंदोलनात कुणाल बोंद्रे यांच्यासह शे.अनिस शे.बुढन, शैलेश बाहेती, सुरेश बोंद्रे, शहेज़ाद अली खान, न. प. गट नेते प्रा. डॉ. राजु गवई, न. प. सभापती नामदेव गुरूदासाणी, अनुप महाजन, सुदर्शन खरात, दत्ता सुसर, यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, सुभाष देव्हडे, जय बोंद्रे, अप्पु गुप्ता, शे. इमरान, पप्पु राजपुत, विक्की शिनगारे, रवि देशमुख, किशोर कोईटे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.