खामगाव-जालना मार्ग ‘पीपीपी’द्वारे!
By admin | Published: October 16, 2016 02:27 AM2016-10-16T02:27:00+5:302016-10-16T02:27:00+5:30
खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा.
बुलडाणा, दि. १५- खामगाव - जालना रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, हा मार्ग खासगी विकासक भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) द्वारे उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत रेल्वे खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले.
केंद्रीय योजनांचा समावेश असलेल्या दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमूलकर व चैनसुख संचेती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, मेहकर पंचायत समितीचे सभापती सागर पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी आढावा घेताना खासदार म्हणाले, केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून विकासाचा सामाजिक समतोल साधत काम करत आहे. या संपूर्णपणे केंद्राच्या अखत्यारित असणार्या व केंद्र पुरस्कृत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविल्या पाहिजे. या योजनांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तीचा विकास करणे शक्य आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांंंगीण विकास करणे शक्य होईल. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराप जाधव यांनी यावेळी केल्या. मनरेगामध्ये कुशल व अकुशल कामांवरचा खर्च पूर्ण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे नियमानुसार कामांच्या टक्केवारीनुसार सहभाग बघून कामे घ्यावीत. कुशल कामांचे थकलेले देयके पूर्णपणे त्वरित अदा करावे. मनरेगामध्ये पशुसंवर्धन, मृद व जलसंधारण, फळबाग लागवड आदींसह विविध यंत्रणांची नियमात बसत असलेली कामे घ्यावीत. मागील काळात मंजूर असलेल्या लोणार तालुक्यातील मनरेगाच्या विहिरी पात्र आहेत; मात्र पूर्ण झाल्या नाहीत. अशा विहिरी त्वरित पूर्ण कराव्यात. जेणेकरून त्या भागातील शेतकर्यांना विहिरींच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ होईल. ते पुढे म्हणाले, की प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत या वर्षी विमा भरलेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्या नियुक्त समितीने पीक विमा भरलेल्या व नुकसान झालेल्या शेतकर्यांना विमा कंपनी, कृषी विभाग किंवा बँक यांच्याकडे अर्ज करायला लावावा. तसेच अर्ज प्राप्त शेतकर्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना मदत मिळवून द्यावी. शेतकर्यांनी नुकसान झाले असल्यास कृषी विभाग, ग्रामसेवक, बँक प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. घरकुल योजनेसंदर्भात बोगस लाभार्थी असल्याबाबत त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ८६ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी १४ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी विविध विभागप्रमुखांनी आपल्या खात्याच्या योजनेविषयी माहिती दिली. आमदारांनी विविध समस्या मांडल्या. बैठकीला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे विभागप्रमुख, रेल्वेचे अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचलन चंद्रशेखर जोशी यांनी, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी मानले.