खामगाव: लहान मुलांच्या वादातून दोन गटात जुपंली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 04:40 PM2020-04-28T16:40:38+5:302020-04-28T16:40:43+5:30
ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता दरम्यान स्थानिक मस्तान चौकात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लहान मुलांच्या वादातून एकाच समाजाच्या दोन गटात हाणामारी झाली. यात तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता दरम्यान स्थानिक मस्तान चौकात घडली.
मस्तान चौक, जुना फैल भागातील दोन कुटुंबात जुना वाद आहे. लहान मुलांच्या खेळण्यावरून हा वाद सोमवारी सायंकाळी पुन्हा उफाळून आला. त्यामुळे दोन्ही गटातून दगडफेक करण्यात आली. तसेच दोन गटातील दोघांमध्ये हाणामारी झाली. यात एका लहानमुलीसह तिघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर आणि शिवाजी नगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन गटातील काळी जणांना ताब्यात घेण्यात आले. जखमी पैकी एकाला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. जखमी झालेल्या एका इसमाचे नाव सै. अक्रम असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. वृत्त लिहीस्तोवर शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही गटाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू होती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दगडफेक झाली. यात तीन जण किरकोळ जखमी झाल्याचे शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षण सुनिल हुड यांनी सांगितले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
अप्पर पोलिस अधिक्षक पोहोचले घटनास्थळी!
संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खामगावातील मस्तान चौकात दोन गटात वाद उफाळून आल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनीही घटनास्थळी धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.