खामगाव कृउबासचे सभापती, संचालकांना दिलासा
By admin | Published: February 18, 2017 03:16 AM2017-02-18T03:16:10+5:302017-02-18T03:16:10+5:30
सहायक निबंधकांचे आदेश उच्च न्यायालयाने ठरविले रद्दबातल.
खामगाव, दि. १७- खामगाव कृउबास सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दिपके, संचालक श्रीकृष्ण टिकार यांना अपात्र करून संचालक पदावरून बरखास्त करावे, असे सहायक निबंधकाने दिलेले आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी रद्दबातल ठरविले आहे.
खामगाव कृउबासवर काँग्रेस, भारिप बहुजन महासंघाची सत्ता असून, निवडून आलेल्या संचालकांच्या ग्रामसेवा सहकारी संस्था बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त झाल्याने सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दिपके व संचालक श्रीकृष्ण टिकार हे संचालक पदावर राहण्यास अपात्र आहेत, असे प्रकरण सहायक निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी सहायक निबंधक यांनी तीनही संचालक अपात्र असल्याचा आदेश दिला होता. या निर्णयाविरुद्ध या तीनही संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी संचालकांच्या बाजूने निर्णय दिला असल्याची माहिती पक्षकारातर्फे काम पाहणारे अँड. आर.जे. मिर्झा व अँड. मंदिपसिंग शीख यांनी दिली.
खामगाव कृउबा समितीवर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाची सत्ता जावी म्हणून ना. फुंडकरांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सहायक निबंधक यांच्यावर दबाव टाकून उपरोक्त तीनही संचालकांचे संचालकपद रद्द केले होते; परंतु १७ फेब्रुवारी रोजी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश रद्दबातल केल्याने विरोधकांना चपराक बसली असून, सत्याचाच विजय झाला आहे.
- संतोष टाले,
कृउबास सभापती.