#खामगाव कृषी महोत्सव : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:18 AM2018-02-17T00:18:26+5:302018-02-17T00:19:01+5:30
खामगाव : शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३0 वाजता होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३0 वाजता होत आहे.
या उद्घाटन सोहळ्यास कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे, आ. अँड. आकाश फुंडकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, नवे वाण, नवे प्रयोग यांची माहिती शेतकर्यापर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या मालिकेतील पहिला महोत्सव खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. १६ ते २0 फेब्रुवारीदरम्यान होणारा हा कृषी महोत्सव पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा असून, चारशे दालने उभारण्यात आली आहेत. यामध्ये शेतीविषयक माहिती, तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रिय शेती, सौर शेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रिया उद्योग व पशुपालन यासह अत्याधुनिक प्रात्यक्षिकांद्वारे शेतकर्यांना माहिती देण्यात येईल. या कृषी महोत्सवाला शेतकर्यांनी मोठय़ा संख्येने भेट देऊन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन ना. भाऊसाहेब फुंडकर, आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.
बैलगाडी दिंडीने वेधले लक्ष!
कृषी महोत्सवाच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी येथे बैलगाडी दिंडी काढण्यात आली. या बैलगाडी दिंडीला राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी या दिंडीचे नेतृत्व केले. बैलगाडी दिंडी निघण्यापूर्वी सहभागी होणार्या शेतकर्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या रॅलीत शेकडो शेतकरी बांधव बैलगाडीसह व ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. ही बैलगाडी दिंडी आकर्षण ठरली.