खामगाव पालिकेचा रखडलेला अर्थसंकल्प होणार सादर!
By admin | Published: March 9, 2016 02:34 AM2016-03-09T02:34:30+5:302016-03-09T02:34:30+5:30
विशेष सभेविना सादर होणार नगरपालिकेचा अर्थसंकल्प
खामगाव : खामगाव नगरपालिकेचा रखडलेला अर्थसंकल्प लवकरच सादर होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हाधिकार्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी ११0 कोटीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून, तो त्यांच्या माहितीस्तव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तथापि अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार हा नगराध्यक्षांचा असल्याने अर्थसंकल्प संदर्भातील प्रशासकीय हालचालीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
खामगाव नगरपालिकेचा अर्थसंकल्प ११0 कोटींचा असून, तो ६ कोटी शिलकीचा असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सर्वसाधारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जातो; मात्र खामगाव पालिकेत नगराध्यक्ष एका कथित अपहार प्रकरणात अडकल्यामुळे ते बाहेरगावी आहेत. त्यामुळे नगर पालिकेत अर्थसंकल्प मंजूर करण्यासंदर्भातील विशेष सभा बोलाविण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्या पृष्ठभूमीवर नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पर्यायी उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करून प्रभारी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांकडे माहितीस्तव तसेच पुढील प्रक्रियेसाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे.