अवैध नळ जोडणी विरोधात खामगाव पालिकेने थोपटले दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:29 PM2018-06-13T18:29:29+5:302018-06-13T18:29:29+5:30
खामगाव: शहरातील अवैध नळ कनेक्शनधारक आता पालिकेच्या रडारवर असल्याचे दिसून येते. शहरातील अवैध नळ जोडणी कापण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.
खामगाव: शहरातील अवैध नळ कनेक्शनधारक आता पालिकेच्या रडारवर असल्याचे दिसून येते. शहरातील अवैध नळ जोडणी कापण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाने शहर पोलिसांशी पत्रव्यवहार चालविला आहे. बुधवारी दुसरे स्मरणपत्र पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.
खामगाव शहरात दहा हजारावर वैध नळ कनेक्शन धारक आहे. तर मुख्य पाईपलाईनसोबतच शहरातील अंतर्गत पाईपलाईनवर काही नागरिकांनी अवैध नळ जोडणी घेतली आहे. अवैध नळ जोडणीमुळे वैध कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. वैध कनेक्शन धारकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. या कारवाईचाच एक भाग म्हणून शहरात गत दोन महिन्यांच्या कालावधीत अवैध नळ कनेक्शन शोध मोहिम राबविण्यात आली. अवैध नळ कनेक्शन शोधण्यात आल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्यावतीने हे नळ कनेक्शन कापण्यात येत आहे. अवैध नळ जोडणी कापतांना नागरिकांशी वाद उद्भवत असल्याने पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून पोलिस निरिक्षक शहर पोलिस स्टेशन यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
अनेकांवर फौजदारी कारवाई प्रस्तावित!
शहराच्या विविध वस्त्यांमध्ये अवैध नळ जोडणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये दुसºयांदा अवैध जोडणी आढळून आल्याने काही जणांवर पालिका प्रशासनाकडून फौजदारी कारवाई प्रस्तावित केली असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील अवैध नळ जोडणीमुळे वैध कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा प्रभावित होतो. त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मागील महिन्यात काही अवैध नळ कनेक्शन शोधण्यात आलेत. अवैध नळ जोडणी तोडण्यासाठी पोलिसांना संरक्षण मागितले आहे.
- नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, खामगाव.