खामगाव नगर पालिका इमारतीच्या तळघरात शिरले पावसाचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:42 PM2019-09-24T14:42:37+5:302019-09-24T14:43:28+5:30
प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या तळघराच्या प्रवेशद्वारावर तब्बल गुडघाभर पाणी साचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नगर पालिकेच्या तळघरात मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे तळघरात ठेवलेल्या साहित्याची नासधूस झाल्याचे दिसून येते. मात्र, याबाबत खामगाव नगर पालिकेचा सामान्य प्रशासन आणि भांडार विभाग अनभिज्ञ असल्याचे समजते.
खामगाव नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या खाली एक मोठे तळघर आहे. या तळघरात स्वच्छता आणि इतर कामासाठी लागणारे साहित्य तसेच पालिकेच्या जाहिरातीसाठी लागणाऱ्या लोखंडी फे्रम ठेवण्यात आल्या आहेत. काही लोटगाड्या आणि इतर साहित्यही या तळघरात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गत आठवड्यात खामगाव शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पालिकेच्या तळघरात शुक्रवारपासून मोठ्याप्रमाणात पाणी साचले. रविवारीही देखील या पाण्यात भर पडली. त्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या तळघराच्या प्रवेशद्वारावर तब्बल गुडघाभर पाणी साचले. मात्र, याबाबत सामान्य प्रशासन विभागासोबतच भांडार विभागाला कोणतीही माहिती नव्हती. काही जणांनी ही बाब भांडार विभागाच्या निर्दशनास आणून दिली. मात्र, तरी देखील सोमवारी सायंकाळपर्यंत तळघरातील पाणी काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)