खामगाव पालिका सभेत गदारोळ; सभेतील विषय घेतले परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:44 AM2018-03-18T00:44:48+5:302018-03-18T00:44:48+5:30
खामगाव(जि.बुलडाणा): पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील तब्बल ११ विषय शनिवारी परत घेण्यात आले. या विषयावरून विरोधी सदस्यांनी सभेत चांगलाच गदारोळ केला. दरम्यान, विषय सूचीवरील विविध ११ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव(जि.बुलडाणा): पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील तब्बल ११ विषय शनिवारी परत घेण्यात आले. या विषयावरून विरोधी सदस्यांनी सभेत चांगलाच गदारोळ केला. दरम्यान, विषय सूचीवरील विविध ११ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी शनिवारी दुपारी पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेतील ११ विषयांवर विरोधी सदस्यांनी विरोध नोंदविला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी विषय सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील सर्वसाधारण की खास सभा ही ‘चूक’ अधोरेखित करीत, सभागृहाला धारेवर धरले. नगराध्यक्षांनी शनिवारची सभा सर्वसाधारण असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सभेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच विषय सूचीवरील ११ विषयांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिपच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. दरम्यान, विषय सूचीवरील १२ ते २३ विषयांची टिपणी देण्यात आलेली नसल्याने, उपरोक्त विषयांचे सूचक तथा उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार यांनी हे सर्व विषय परत घेतले. पीठासीन अधिकाºयांच्या उपस्थितीत सूचीवरील विषय उपाध्यक्षांना परत घेण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करून सभेत गोंधळाला सुरुवात केली. त्यावेळी नगरपालिका अधिनियमांतर्गत विषय सूचीवरील विषय परत घेता येत असल्याचे स्पष्टीकरण मुख्याधिका-यांनी दिले. तरीही १२ ते २३ हे विषय गंभीर असल्याने, तसेच सत्ताधारी बॅकफुटवर आल्याचा कांगावा करीत विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. पालिकेत आज पुन्हा नोटीस प्रकरणाचे नाट्य रंगले; मात्र सत्ताधा-यांनी यामध्ये बाजी मारल्याचे दिसून आले.
काँग्रेस नगरसेवकांच्या अपात्रतेप्रकरणी बुधवारी खाससभा
काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना बजावण्यात आलेल्या अपात्रतेप्रकरणी बुधवार २१ मार्च रोजी पालिकेची खास सभा आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या कारणे दाखवा नोटीसच्या अनुषंगाने विरोधी सदस्यांचा ९ फेब्रुवारीचा खुलासा नगराध्यक्षांनी अमान्य ठरविला आहे. त्यानुषंगाने कायदेशीर बाजू भक्कम करीत सत्ताधाºयांकडून डावपेच आखण्यात आल्याचे समजते.
सत्ताधा-यांचा गनिमी कावा!
विषय सूचीवरील १२ ते २३ पर्यंतचे सर्व विषय परत घेत, पालिका सभागृहात शनिवारी सत्ताधा-यांनी गनिमी कावा खेळला. सत्ताधारी बॅकफुटवर आल्यानेच विषय सूचीवरील विषय परत घेतल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला; मात्र सभा संपताच १२ ते २३ पर्यंतच्या विषयांच्या ‘खास सभेचा’ अजेंडा पालिका प्रशासनाकडून वितरित करण्यात आला. काही नगरसेवकांना चक्क पालिका आवारात खास सभेच्या नोटीस देण्यात आल्या. परिणामी, विरोधी सदस्यांचा आनंद औटघटकेचा ठरल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली.
अपात्रतेचा प्रस्ताव कायदेशीर!
नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी ३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या इब्राहीम खान सुभान खान, अमेय राजेंद्र सानंदा, प्रवीण कदम, भूषण शिंदे, अर्चना टाले, शीतल माळवंदे, संगीता पाटील, शेख फारूक बिसमिल्ला, शेख रिहानाबानो, अ. रशिद अ. लतिफ, अलका सानंदा, सरस्वती खासने या १२ नगरसेवकांना पालिका सभेतील गैरवर्तन आणि पालिकेची कायदेशीर नोटीस गैरकायदेशीर ठरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२(३) अन्वये यथाशक्ती अशी शिफारस का करण्यात येऊ नये किंवा असा आदेश का देण्यात येऊ नये, नोटीस बजावण्यात आली, यासंदर्भात कारण दाखविण्याची वाजवी संधी दिल्यावाचून अशी शिफारस संमत करता कामा नये किंंवा आदेश देता कामा नये, याप्रमाणे कारण दाखविण्याची वाजवी संधी दिल्याचे दिसून येत असल्याची टिप्पणी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांच्या अपात्रतेचा ठराव कायदेशीर असल्याचा दावा सत्ताधा-यांकडून केल्या जात आहे.