खामगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पालिका सज्ज; आठ दक्षता पथके गठीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:24 PM2020-04-03T12:24:58+5:302020-04-03T12:25:11+5:30
मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिकेतील विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश असलेली आठ दक्षता पथकं तैनात केली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव नगर पालिकेने आठ दक्षता पथके गठीत केली आहे. या पथकांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचाल तसेच कोरोनो उपाययोजनेसाठी खबरदारी घेतली जात आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजाराने संपूर्ण जगभर हाहाकार माजविला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ५ जण या महाभयंकर आजाराने ग्रस्त असून, यातील एकाचा मृत्यू झाला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिलेत. प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच, खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून स्व:स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खामगाव शहरात दुसºयांदा निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली असतानाच, आता शहराच्या विविध भागात लक्ष ठेवण्यासाठी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिकेतील विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश असलेली आठ दक्षता पथकं तैनात केली आहे. या पथकांकडून शहरातील प्रत्येक प्रभागावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सील ठोकण्यात आलेल्या प्रभागात तसेच कोरोना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या परिसरावर या पथकाची विशेष निगराणी आहे.
सर्वच १६ प्रभागांवर पालिकेचे लक्ष!
खामगाव शहरातील विविध वस्त्यांची १६ प्रभाग आणि ३२ वार्डांमध्ये विभागणी केली आहे. नगर पालिकेच्या एका दक्षता पथकाकडे दोन प्रभागांची (चार वार्ड) जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला एक चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरात प्रत्यक्ष फिरून हे पथक वार्डांवर लक्ष ठेवून आहे.
उपनगराध्यक्ष पालिकेत तळ ठोकून!
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने खामगावात उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार गत दहा दिवसांपासून नगर पालिकेत तळ ठोकून आहेत. शहरातील निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी आणि स्वच्छतेबाबत ते स्वत: आढावा घेत आहेत.