खामगाव : नगरपालीका कर विभागाने केली तीन दिवसांत ५0 लाख रुपयांची वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:17 AM2017-12-29T00:17:34+5:302017-12-29T00:18:03+5:30
खामगाव : येथील नगरपालिकेच्या कर विभागाने सन २0१७-१८ या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५0 लाख रुपयांची वसुली केली आहे; मात्र शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून खामगाव पालिका शंभर टक्के वसुली करण्यास अपयशी ठरणार असल्याचे संकेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील नगरपालिकेच्या कर विभागाने सन २0१७-१८ या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५0 लाख रुपयांची वसुली केली आहे; मात्र शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून खामगाव पालिका शंभर टक्के वसुली करण्यास अपयशी ठरणार असल्याचे संकेत आहेत.
सन २0१७-१८ मध्ये थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ८ कोटी ५५ लाख ७१ हजार २३४ रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना करवसुलीसाठी पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असून, एप्रिल २0१७ ते ऑक्टोबर २0१७ या सात महिन्यांच्या कालावधीत पालिकेची केवळ ७८ लाख ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली केली असून, नोव्हेंबर अखेरीस करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी केवळ ९.२२ टक्के एवढीच होती. डिसेंबर महिन्यात पालिका प्रशासनाने वसुलीसाठी कंबर कसली असून, कर वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वसुलीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरनंतर कराचा भरणा केल्यास मालमत्ताधारकांना २ टक्के शास्ती लागणार आहे. परिणामी, मालमत्ताधारकांकडून कराचा भरणा करण्यास प्राधान्य दिल्याने सोमवार ते बुधवार या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ५0 लाख रुपयांची वसुली झाली आहे. शासकीय कार्यालयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
तर लागणार दोन टक्के शास्ती!
शहरातील सर्वच मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत कराचा भरणा करणे अ पेक्षित आहे. ३१ डिसेंबर नंतर कराचा भरणा करणार्यांवर २ टक्के शास्ती लावल्या जाईल. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अन्यथा नळ जोडणीही तोडणार!
३१ डिसेंबरनंतर मालमत्ता कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये नळ कनेक्शन जोडणी कारवाईचा भाग म्हणून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती नगरपालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मालमत्ता जप्तीसोबतच, इतरही कायदेशीर कारवाई पासून सुटका करण्यासाठी, ३१ डिसेंबरपर्यंत सर्व थकबाकीदारांनी थकीत कराचा भरणा करून पालिकेस सहकार्य करावे. उद्दिष्टपूर्तीसाठी विविध उपाययोजना पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहे.
- धनजंय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव.