खामगाव: 'मिशन ओ-२' कडून ‘नारायण सेवा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 04:58 PM2020-04-05T16:58:53+5:302020-04-05T16:59:03+5:30
पाच हजार जेवणाची पाकीटं वितरीत केली असून, शहराच्या विविध भागात मंडळाकडून आरोग्य सेवाही नि:शुल्क दिल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोनाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशन ओ-२ आणि खंडोबा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. गत दहा दिवसांत या मंडळाच्या स्वयंसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने पाच हजार जेवणाची पाकीटं वितरीत केली असून, शहराच्या विविध भागात मंडळाकडून आरोग्य सेवाही नि:शुल्क दिल्या जात आहे.
कोराना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला असून लॉकडाऊनमुळे गोर गरीब, बेघर आणि विस्थापितांची कोंडी लक्षात घेता मिशन ओ-२ अंतर्गत २३ मार्चपासून नारायण सेवेला सुरूवात करण्यात आली. जीवनावश्यक किट आणि आरोग्य सेवा उपक्रमातंर्गत दररोज जेवणाची ५०० पाकीटे वितरीत केल्या जात आहेत. या उपक्रमाला महसूल आणि पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. कर्तव्यावर असलेले पोलिस, आरोग्य कर्मचाºयांनाही या सुविधेचा लाभ दिल्या जात आहे.
भोजन तयार करण्यासाठी शिवाजी वेस भागातील खंडोबा महिला मंडळाच्या पदाधिकारी प्रयत्नरत आहेत. तर भोजनाची पाकीटे खंडोबा मित्र मंडळाचे पदाधिकारी वितरीत करीत आहे. या मंडळाच्या उपक्रमात पोलिस प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे.
कॅम्फोरा औषधाचे नि:शुल्क वितरण
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पत्रकार यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. राजनशंकरन यांनी सुचविलेल्या कॅम्फोरा या होमिओपॅथी औषधीचे वितरण मिशन ओ-२ अंतर्गत करण्यात आले. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना होमीओपॅथी तज्ज्ञ डॉ. कालीदास थानवी यांच्याकडून ही औषध विनामुल्य देण्यात येत आहे.