Khamgaon News : डम्पिंग ग्राऊंडवरील धग थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:31 AM2021-05-18T11:31:07+5:302021-05-18T11:31:35+5:30
Khamgaon News: कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल १६ बंब रिचविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा पेटविण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. रविवारी सकाळी घाटपुरी रोडवरील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याने पुन्हा पेट घेतला. त्यामुळे कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल १६ बंब रिचविण्यात आले. तरी देखील सोमवारपर्यंत कचऱ्याला लागलेली आग आटोक्यात आलेली नव्हती.
खामगाव शहरातील विविध वस्तींमधून संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट घाटपुरी रोडवरील डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते. दरम्यान, गत काही महिन्यांपासून खामगाव येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेट घेत आहे. कचऱ्याला वारंवार लागत असलेल्या आगीमुळे गोपाळ नगर, घाटपुरी नाका, पंजाब ले-आऊटसह परिसरात धुराचे लोट पसरतात.
त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर ऐन कोरोना काळात विपरित परिणाम होत असल्याने, पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. तीन दिवसांनंतरही ही आग आटोक्यात आलेली नव्हती. त्यानंतर तब्बल तीनवेळा या ठिकाणी आग लागली. बायो मेडिकल वेस्टचे संकलन केल्यानंतर डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्या जातो. त्यानंतर हा कचरा पेटविण्यात येत असल्यानेच डम्पिंग ग्राऊंडला आग लागत असल्याची चर्चा आहे.
नागरिकांच्या भावनांचा उद्रेक; निषेध म्हणून नगराध्यक्षांच्या घरासमोर जाळला कचरा!
डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला वारंवार आग लागते. त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे त्वचा आणि इतर आजार वाढीस लागलेत. कोरोना काळात पालिकेचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गोपाळ नगर आणि परिसरातील संतप्त नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. पालिकेत विविध आंदोलन केल्यानंतरही काहीच उपयोग न झाल्याने, या भागातील संतप्त युवकांनी निषेध म्हणून चक्क नगराध्यक्षांच्या घरासमोर कचरा पेटविला होता. मात्र, त्यानंतरही डम्पिंग ग्राऊंडवर जळणाऱ्या कचऱ्याची धग थांबत नसल्याचे चित्र आहे.