खामगाव: आरओ प्लांटधारकांना नोटिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 03:44 PM2020-11-20T15:44:27+5:302020-11-20T15:44:36+5:30
Khamgaon News खामगाव नगर परिषदेने शहरातील २७ आरअेा प्लांट संचालकांना नोटिस बजावली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशानंतर उशिराने का होईना खामगाव नगर परिषदेने शहरातील २७ आरअेा प्लांट संचालकांना नोटिस बजावली. सोबतच काही प्रभागातील आरअेा प्लांटची माहिती अद्याप न मिळाल्याने त्त्यांनाही दोन दिवसात नोटीस दिली जाईल.
जिल्ह्यातील नगर पालिकांनी आरअेा प्लांटच्या विविध परवानग्यांची तपासणी करून सील करण्याची कारवाई सुरू केली. त्याबाबचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खामगाव पालिकेच्या करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये शहरातील १६ प्रभागातील २४ कर्मचाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली. काही जणांनी अद्याप माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांना नोटिस बजावता आली नाही. गुरूवारपर्यंत २७ आरअेा प्लांट संचालकांना नोटिस देण्यात आल्याची माहिती आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाच्या आदेशानुसार निर्देशाचे पत्र दिले आहे. त्यामध्ये आरअेा प्लांट, पाणी शितकरण युनिट, तसेच त्याची बरणी किंवा कँनमधून विक्री करण्यासाठी परवानगी, तसेच जार किंवा कँनच्या माध्यमातून खुल्या पद्धतीने केली जाणारी विक्री मानवी आरोग्यास धोकादायक आहे. त्यावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी लवादाच्या निर्देशानुसार चौकशी करावी, तसेच निकषानुसार सुरू नसलेल्या प्लांटवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार पालिकेने आता नोटिस दिली. त्यामध्ये केंद्रीय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेची परवानगी, पाण्याची गुणवत्ता प्रमाणित करणाऱ्या यंत्रणेचे प्रमाणपत्र, व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे सांगितले आहे. मुदतीनंतर ही कागदपत्रे सादर न केल्ल्यास प्लांट सील करणार आहे.