खामगाव : स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण ‘क्वारंटीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:52 AM2020-04-01T11:52:56+5:302020-04-01T11:53:04+5:30
तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे स्थलांतर करणाऱ्या ९ जणांना येथील बाळापूर नाक्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना विषाणुला रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. दरम्यान, स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण खामगाव शहरात क्वारंटीन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यातील कामगार वर्गही मोठा प्रभावित झाला असून काम नसल्याने सर्व आपल्या राज्यात स्थलांतर करीत आहेत. खामगाव शहरातून स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले ९ युवकांना १४ दिवसांसाठी क्वारंटीन करण्यात आले आहे. कोव्हीड- १९ च्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मजुर आणि कामगार वर्ग स्थलांतरण करीत असल्याने प्रशासनासमोर या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ज्या ठिकाणी मजूर स्थलांतरीत करतांना मिळून येईल त्यांना तेथेच डिटेन करून १४ दिवसांसाठी क्वॉरंटीन करावे तसेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी जळगाव खान्देश येथून तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे स्थलांतर करणाऱ्या ९ जणांना येथील बाळापूर नाक्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांचेकडून या युवकांमध्ये सोशल डिस्टन्सींग ठेवण्यात आले आहे.
सर्व युवकांना येथील महसुल विभागाच्या ताब्यात देवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची तसेच आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणेदार अंबुलकर यांनी दिली.
(प्रतिनिधी)