निराधार मुले नातेवाईकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:16 PM2018-12-21T12:16:00+5:302018-12-21T12:17:04+5:30
खामगाव : बाजारात फिरत असलेल्या निराधार मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बाजारात फिरत असलेल्या निराधार मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. शिवाजी नगर पोलिसांनी सामाजिक दायित्वातून दोन मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतला.
शहरात फरशी भागात शिवाजी नगर पोलिसांना शंकर अशोक शिंदे (८) आणि अजय अशोक शिंदे (६) ही दोन मुले सोमवारी रडताना आढळून आली. या दोन्ही भावंडांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ही दोन्ही मुले आपल्या आजीकडे खामगाव येथे राहत होती. पुण्याला वडीलांकडे जायचे, असे सांगत त्यांनी घर सोडले. मात्र, पुढे रस्ता विसरल्याने, फरशी परिसरात ते पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी या मुलांची चौकशी करून नातेवाईकांचा शोध सुरू केला असता, त्यांची आजी लिलाबाई मिरेकर फरशी भागात त्यांच्या शोधात भटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही मुले आजीच्या स्वाधीन करण्यात आली. त्याचप्रमाणे यापूर्वी शेख रेहान शेख इब्राहीम (६) या मुलाने वडील रागावल्याने घर सोडले होते. महाकाल चौकात रडत असताना पोलिसांनी त्याला त्याब्यात घेवून वडीलांच्या स्वाधीन केले. याशिवाय शेख उजेब शेख रफिक (१२) या गतीमंद मुलाला देखील शिवाजीनगर पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोउपनी उरकुडे, एएसआय राजपूत, गवई यांनीही कारवाई केली.