बेशिस्त वाहनांवर कारवाईत खामगाव पोलीस अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:41 AM2021-01-05T11:41:49+5:302021-01-05T11:41:56+5:30
Khamgaon traffic police News दहा हजारांपेक्षा जास्त दुचाकीस्वारांना खामगाव पोलिसांनी गत वर्षभरात आपला हिसका दाखविला.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त दुचाकीस्वारांना खामगाव पोलिसांनी गत वर्षभरात आपला हिसका दाखविला. या वाहनधारकांकडून ३६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याने कारवाई आणि दंडवसुलीत खामगाव पोलीस जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे दिसून येते.
गत वर्षभरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. समज देऊनही वाहनचालकांच्या वर्तणुकीत बदल न घडल्याने शहर पोलिसांनी कारवाईवर भर दिला.
यामध्ये खामगाव शहर आणि परिसरात १० हजार ८७९ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये त्यांच्याकडून ३७ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात मदत झाली.
कोरोना काळात सर्वाधिक कारवाया खामगावात !
कोरोना संचारबंदी कालावधीत वाहतूक नियमांचे तसेच कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे भंगप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई खामगाव शहर पोलिसांनी केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्यांना ‘योग आणि प्राणायमाची’ अनोखी शिक्षा शहर पोलिसांनी केली होती.
अवैध प्रवासी वाहतुकीलाही वेसण !
खामगाव शहर आणि परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली. गत वर्षभरात शहर पोलीस स्टेशन हद्दीत ३५६ कारवाई करण्यात आल्या. या कारवाईच्या माध्यमातून १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहतुकीला वळण लावण्यासाठी गत वर्षभरात दहा हजारांपेक्षा जास्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूकप्रकरणी ३५६ कारवाई शहर पोलिसांनी केली आहे.
- सुनील अंबूलकर
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव