‘हेल्मेट’ जनजागृतीसाठी खामगाव पोलिस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 04:39 PM2018-12-29T16:39:09+5:302018-12-29T16:39:36+5:30
नवीन वर्षांपासून वाहन धारकांनी हेल्मेट वापरण्याच्या समुपदेशनासाठी खामगावातील चौका-चौकात जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पोलिस प्रशासनाला शिस्त लावण्याचा विडा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी उचलला आहे. त्याअनुषंगाने पोलिसांना हेल्मेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या सूचनेचे अनुकरण करीत खामगाव शहर आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शनिवारपासूनच हेल्मेट वापरण्यास सुरूवात केली आहे. इतकेच नव्हे तर नवीन वर्षांपासून वाहन धारकांनी हेल्मेट वापरण्याच्या समुपदेशनासाठी खामगावातील चौका-चौकात जनजागृती केली.
बुलडाणा जिल्ह्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन आणि पोलिस विभागाचे संयुक्तरित्या नियोजन सुरू आहे. दुचाकीने येणाºया शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेटचा सक्तीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनाही दुचाकीवर गस्त आणि कर्तव्यावर असताना हेल्मेट वापरण्याच्या गंभीर सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने खामगाव येथील वाहतूक पोलिसांसोबतच शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ‘हेल्मेट’ सक्तीच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती सुरू केली आहे.
बस स्थानक चौकातून जनजागृतीला सुरूवात!
शहरातील चौका-चौकात पोलिसांनी स्वत: हेल्मेट घातले. तसेच वाहनधारकांना हेल्मेट वापरण्यासंदर्भात सूचनाही केल्या. यावेळी नियम मोडणाºया ३४ वाहन धारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई देखील केली. बस स्थानका नजीकच्या चौकातून जनजागृतीला सुरूवात करण्यात आली. यामध्ये सहा. पोलिस उप निरिक्षक अरविंद राऊत, प्रताप चेपटे, संजय इंगळे, विठ्ठल डाबेराव, शे. चाँद, प्रफुल टेकाडे, मनिष डुकरे यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सहभाग दिला.
पोलिस दलातील प्रत्येकाने सक्तीने हेल्मेट वापरण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आहेत. पोलिसांना शिस्त लागावी यासाठी शनिवारपासूनच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. हेल्मेट सक्तीसाठी वाहन धारकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे.
- संतोष ताले, पोलिस निरिक्षक, खामगाव.