फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी खामगाव ठरतेय आशेचा किरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:31 PM2020-04-16T12:31:40+5:302020-04-16T12:31:53+5:30

शेतकऱ्यांना खामगाव कृषी विभागाने दोन टन मोसंबी आणि एक टन द्राक्षाची ऑर्डर दिली आहे. 

Khamgaon A ray of hope for Froot productive farmers! | फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी खामगाव ठरतेय आशेचा किरण!

फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी खामगाव ठरतेय आशेचा किरण!

Next

- देवेंद्र ठाकरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगावः जिल्ह्यात खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजीपाल्यापाठोपाठ फलोत्पादन विक्रीसाठीसुद्धा  एक दालन  निर्माण करून दिले आहे.  घाटावरील शेतकऱ्यांना खामगाव कृषी विभागाने दोन टन मोसंबी आणि एक टन द्राक्षाची ऑर्डर दिली आहे. 

कोरोना आजारामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका बसला, तो शेतकऱ्यांना! भाजीपाला तसेच फळे दीर्घकाळ टिकत नसल्यामुळे आणि पाहिजे त्या प्रमाणात वाहतुकीची सोय नसल्यामुळे शेकडो हेक्टरवरील भाजीपाला तसेच फळांचे उत्पादन धोक्यात आले. यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला. यावर तोडगा काढण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले. जिल्ह्यात खामगाव मोठे शहर असल्याने खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शहरात ठीक ठिकाणी शेतकऱ्यांना स्पाॅट आखून देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सध्या सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात येत आहे. भाजीपाल्या पाठोपाठ फलोत्पादक यांचेही होणारे नुकसान लक्षात घेता, त्यासाठीही एक दालन निर्माण करण्याचा निर्णय खामगाव तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यात घाटावर देऊळगावराजा, चिखली परिसरात द्राक्ष तसेच मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सध्याच्या काळात माल जिल्ह्याबाहेर जाऊ शकत नसल्याने फळे जागेवरच सडत आहेत. यातून होणारे लाखो रुपयांचे नुकसान पाहता, खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून घाटावरील शेतकऱ्यांना बुधवारी दोन टन मोसंबी आणि एक टन द्राक्षाची ऑर्डर देण्यात आली. हा माल खामगाव शहरात विक्री करून देण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्पॉटवर उपस्थित राहणार आहेत.

 
दोन तासात 25 क्विंटल टरबूज विक्री!

 बुधवारी खामगाव तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांच्यासह  कर्मचार्‍यांनी शेतकऱ्यांसोबत स्पाॅटवर उपस्थित राहून दोन तासात 25 क्विंटल टरबुजाची विक्री शेतकऱ्यांना करून दिली. सोबतच 30 क्विंटल कांदाही विकला. याशिवाय नियमित सुरू असलेली  भाजीपाला विक्री बघता, खामगाव शहरात दररोज किमान 100 क्विंटल मालाची विक्री कृषी कार्यालयाच्या सहकार्याने होत आहे.

Web Title: Khamgaon A ray of hope for Froot productive farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.