खामगाव-शेगाव दिंडी मार्गावर उसळली 'भक्ती'ची लाट!
By अनिल गवई | Published: August 11, 2024 12:10 PM2024-08-11T12:10:08+5:302024-08-11T12:10:27+5:30
श्रींची पालखी रविवारी सकाळी पोहोचली शेगावात : पालखी सोबत असलेल्या भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत
खामगाव : शनिवारी सायंकाळी खामगावात मुक्कामी आलेल्या शेगावीच्या राणांच्या पालखीने रविवारी पहाटे ४:५० वाजता विदर्भ पंढरी शेगावच्या दिशेने प्रस्थान केले. विदर्भ पंढरीनाथाला श्रध्देचा निरोप देण्यासाठी शनिवारपासूनच खामगाव शहरच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील भाविकांची लगबग सुरू होती. खामगावातील वाड्या वस्त्या पहाटे लवकरच जागे झाल्या. आबालवृध्द, महिला आपल्या चिल्या पिल्यांसह दिंडी मार्गाला लागल्या. रिपरिप पावसाची किंचितही तमा न बाळगता हजारो भाविक पालखी सोबत शेगावात दाखल झाले. त्यामुळे दिंडी मार्गावर भक्तीची लाट उसळल्याचे दिसून आले.
खामगावातून निघालेली श्रींची पालखी शेगावातील नवोदय विद्यालयाजवळ सकाळी ९:२७ वाजता पोहोचली. श्रींची पालखी शेगावात दाखल झाल्यानंतर तब्बल साडेतीन तास दिंडी मार्गावरील वर्दळ कायम होती. श्रींच्या पालखीच्या एक ते दीड तास अगोदर सकाळी ८:४७ वाजता भाविकांची पहिली तुकडी शेगावात दाखल झाली. त्यांच्या पाठोपाठ आणखी काही भाविकही पोहोचले. त्यानंतर आषाढी एकादशीची पंढरपूर वारी करून श्रींची पालखी शेगावात दाखल झाली. त्यावेळी श्री गजानन महाराज संस्थान, प्रशासकीय व्यवस्थेसोबतच भाविकांनी 'ज्ञानोबा माउली तुकाराम, गण गणात बोते'चा जयघोष करीत पालखीचे स्वागत झाले.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील नव्हेतर जळगाव खान्देश, जालना आणि अमरावती येथील भाविकांनी आपली वाहने खामगाव येथे उभी करून खामगाव ते शेगाव पायदळ वारी केली. भर पावसातही भाविकांची गर्दी वाढती असल्याने दिंडी मार्गावर रविवारी केवळ भक्तीचा माहोल असल्याचे दिसून आले. श्रींच्या पालखी सोबतच सुमारे एक लाख भाविकांनी पायदळ प्रवास केल्याचा दावा केला जात आहे.
पालखींचे ठिकठिकाणी स्वागत
श्री गजानन महाराजांच्या पालखी सोबत जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, नास्ता, फराळ, जेवण आणि निशुल्क औषध वितरण करण्यात आले. त्याचवेळी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्वच्छता सेवा केली.
दिंडी मार्गावर बंदोबस्त
पालखीसोबतच भाविकांच्या सुरक्षेची ही काळजी यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. रविवारी दुपारी ३ वाजता पर्यंत हा मार्ग बंद होता. खामगाव, शेगाव पोलीसांचे पथक तैनात होते.