खामगाव: एसटी महामंडळाकडून ‘सावित्री’च्या लेकीची उपेक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:41 PM2018-09-05T12:41:03+5:302018-09-05T12:42:32+5:30
विद्यार्थींनीना शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रात्रीच्यावेळी तात्कळत बसावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
- अनिल गवई
खामगाव: पास असतानाही अनेक विद्यार्थ्यांना बस मधून प्रवासास मनाई करण्याचे प्रकार नियमित घडतात. मात्र, विद्यार्थीनींसाठी बस वारंवार थांबत नाही. त्यामुळे शेगाव येथून खामगावला अप-डाऊन करणाºया अनेक विद्यार्थींनीनाशेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रात्रीच्यावेळी तात्कळत बसावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
‘प्रवाशांच्या सेवा-सुविधेसाठी’ ब्रिद असलेले महामंडळ विविध कारणांनी तोट्यात आले. त्यामुळे वरिष्ठपातळीवरून ‘हात दाखवा- बस थांबवा’,‘प्रवासी अभिवादन’ यासारखे उपक्रम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राबविल्या जातात. मात्र, एसटी महामंडळाच्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांना एसटीचे काही कर्मचारी तिलांजली देत असल्याचे दिसून येते. सामाजिक भावनांबाबत प्रचंड असंवेदनशीलता या कर्मचाºयांकडून दाखविण्यात येते. त्यामुळे अनेक विद्यार्थींना शेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवासी थांब्यावर तात्कळत बसावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला.
महाविद्यालयातील काही प्राध्यापकांसह खामगाव-शेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या शेगाव आणि खामगाव येथील आगार व्यवस्थापकांच्या निर्दशनास आणून दिली. मात्र, या तक्रारींना महामंडळाकडून बेदखल करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पर्यायी प्रवासी वाहतूक साधनांचा अवलंब केल्या जात आहे. मात्र, विद्यार्थीनींना अनेक बंधन असल्यामुळे त्यांच्यासमोर महामंडळाचा ‘त्रास’सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अन्यथा शिक्षण बंद होणार असल्याचीही भीती एका विद्यार्थीनीने यावेळी बोलून दाखविली. यासंदर्भात खामगाव आणि शेगाव येथील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्याचे टाळले.
नियमितच्या समस्येंमुळे विद्यार्थी त्रस्त!
खामगाव येथील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतात. सकाळी १० वाजता हे विद्यार्थी बसने पोहोचतात. सायंकाळी साडेपाच - सहा वाजताच्या सुमारास महाविद्यालयाला सुटी होते. त्यानंतर काही विद्यार्थी-विद्यार्थीनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील प्रवासी थांब्यावर थांबतात. त्यावेळी एसटी महामंडळाची कोणतीही बस या ठिकाणी थांबत नाही. हा प्रकार नित्याचाच झाला असून, तब्बल दीड-ते दोन तास विद्यार्थ्यांना बसची वाट पहावी लागते. परिणामी विद्यार्थींना खामगाव येथे पोहोचण्यास विलंब होतो. यामुळे पालकही चिंतेत पडतात.
असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!
खामगाव बस स्थानकातून शेगाव कडे जाताना काही बसमधून पास धारक विद्यार्थ्यांना मनाई केली जाते. तसेच शेगाव येथे सायंकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर बस थांबत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी ‘लोकमत’प्रतिनिधीने शुक्रवार ३१ आॅगस्ट, सोमवार ३ आणि मंगळवार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भेट दिली. त्यावेळी अनेक बस विनंती करूनही थांबत नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विद्यार्थींनीना खामगाव येथे पोहोचण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारींना दुजोरा मिळाला.
सर्वसाधारण बसेनाही थांबण्याचे वावडे!
शेगाव-खामगाव शटल सेवेच्या बस थांबत नाहीत. तोच कित्ता सर्वसाधारण बस चालक-वाहकांकडून गिरविण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत असतानाच ‘सावित्रीं’च्या लेकीही अडचणीत सापडल्या आहेत. एसटी महामंडळातील कर्मचाºयांच्या या आडमुठ्या धोरणामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीनींची वाताहत होत असल्याच्या संतप्त भावना काही विद्यार्थींनीनी प्रस्तुत प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या.
मंगळवारीही थांबल्या नाहीत बस!
शुक्रवारी या ठिकाणी चार बस थांबल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थींनीना सहा वाजता पासून ८.१८ वाजेपर्यंत तात्कळत रहावे लागले. सोमवारीही हीच परिस्थिती दिसून आली. तर मंगळवारी एम एच ४० ८५५६ या क्रमांकाची बस ७.३८ वाजता थांबली नाही. सोबतच अकोट आणि औरंगाबाद आगाराच्या दोन बस थांबल्या नाहीत. परिणामी विद्यार्थींना तब्बल दोन-अडीच तास तात्कळत रहावे लागले. त्यानंतरही बराच वेळ बस मिळाली नाही. त्यानंतर प्रवासात १ तास गेल्याने या विद्यार्थींनीना खामगाव येथे पोहोचण्यासाठी रात्रीचे दहा वाजले होते.