खामगाव येथील उप माहिती कार्यालय दोन दिवसांपासून बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:10 PM2017-11-03T19:10:25+5:302017-11-03T19:12:38+5:30
खामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत. शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात या आठवड्यात उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत. शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात या आठवड्यात उघडकीस आला. त्यानंतर खडबळून जागे झालेल्या माहिती कार्यालय प्रशासनाने वरिष्ठपातळीवरून खामगाव येथील उप माहिती कार्यालयाची चौकशी करण्याचे ठरविले आहे.
शासन आणि जनसामान्यांमध्ये महत्वपूर्ण ‘दूवा’ म्हणून माहिती कार्यालय महत्वाची भूमिका अदा करते. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजना तसेच शासकीय विभागाच्या प्रसिध्दीची धुरा याच विभागाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, खामगाव येथील प्रशासकीय इमारतीत उपमाहिती कार्यालय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खामगाव येथील उप माहिती कार्यालयाचे कामकाज चांगलेच ढेपाळले आहे. कार्यालयाची कामकाजाच्या वेळेत कार्यालय उघडल्या जात नाही. शिवाय आॅफीस उघडे असले तर कर्मचारी, अधिकारी थांबत नाहीत. अशी अवस्था या कार्यालयाची झाली असतानाच सोमवार २७ आणि मंगळवार २८ आॅक्टोबर रोजी कोणतीही शासकीय सुटी नसताना, उप माहिती कार्यालय बंद होते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. तथापि, यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधला असता, एका अधिकाºयाने चौकशीबाबत अधिक माहिती देण्यास नकार देत, वृत्ताला दुजोला दिला.
उपसंचालकांकडून चौकशी!
खामगाव येथील उप माहिती कार्यालय वेळी-अवेळी उघडण्यासोबतच कार्यालयातील दूरध्वनीही कुणी उचलत नसल्याच्या तक्रारी आहे. त्यातच भरीस भर म्हणून सोमवार आणि मंगळवारी चक्क दोन दिवस या कार्यालयाला कुलूप होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची माहिती उप संचालकांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. संबधीतांची चौकशीही करण्यात येणार असून, दोषींवर कारवाईची टांगती तलवार आहे.
पत्रकारांसोबतच सामान्यांच्याही तक्रारी!
खामगाव येथील ढेपाळलेल्या कारभाराबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. यामध्ये पत्रकार, पत्रकार संघटना आणि सामान्यांच्याही तक्रारीचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी संचालकापर्यंत लेखी केली आहे. प्रेस क्लबचे शरद देशमुख यांनीही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार नोंदविली आहे.