खामगाव परिसरात पावसाने डोळे वटारले!

By Admin | Published: July 11, 2017 12:33 AM2017-07-11T00:33:35+5:302017-07-11T00:37:51+5:30

दुबार पेरणीही उलटल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ: सातत्यपूर्ण दुष्काळामुळे शेतकरी चिंताग्रस्त

Khamgaon surrounded the rain in the rain! | खामगाव परिसरात पावसाने डोळे वटारले!

खामगाव परिसरात पावसाने डोळे वटारले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घाटाखालील विविध तालुक्यांमध्ये वरुण राजाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून दुबार पेरणी केल्यानंतरही अनेकांच्या पेरण्या उलटल्या आहेत. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बोरखेड : गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. बोरखेड, पिंगळी, सोनाळा, वारखेड, पळसोडा आदी भागात १६ जून रोजी दमदार पावसाने हजेरी दिली. त्या आधारे बऱ्याच कोरडवाहू शेतकऱ्यांनी बैलजोडीव्दारे तसेच ट्रॅक्टरने सोयाबीन व कपाशीची पेरणी केली. परिणामी, बियाणे जमिनीत अंकुरले; मात्र पाण्याअभावी पीक जमिनीच्या आत जळाले. तसेच बरेच शेतात बियाणे पेरणीच्या शेतात योग्य पाण्याच्या प्रतीक्षेत पडून आहेत. या भागात २० दिवसांपासून दमदार पाऊस येत नसल्याने अखेर काही शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केलेली शेत वखरले. तसेच काही शेतकरी पुन्हा शेत पेरणीच्या तयारीला लागले आहेत, तरी सतत निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे, तरी संबंधित महसूल विभागाने गावनिहाय शेतपेरणी पीक मोडलेल्या व पेरणी करून पडलेल्या शेताची माहिती घेऊन, शासनाकडून मदत मिळण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.
पळशी परिसरही कोरडाच!
पळशी बु. : या परिसरात जवळजवळ ९५ टक्के पेरणी झाली असून, त्यावर गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडत नसल्याने ही पिके सर्वत्र दुपारच्या वेळी सुकलेली दिसून येतात. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग हा चिंतातूर झाला आहे.
खामगाव तालुक्यात येत असलेल्या पळशी बु. येथे गेल्या मृग नक्षत्रात तुरळक पाऊस पडला. त्यानंतर आठवडाभरांनी १५ ते २० जून दरम्यान थोडाबहुत पाऊस पडला व आता पाऊस पडेल, या आशेने पळशी बु., पळशी खुर्द, चितोडा, अंबिकापूर, कदमापूर, हिंगणा, उमरा, संभापूर, दस्तापूर येथील शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची पेरणी करायला सुरुवात केली. त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची व्यवस्था आहे, अशांनी पाणी देऊन पिके जगवली, तर काहींना दुबार पेरणी करावी लागली, अशी परिस्थिती असता मोलामहागाचे बियाणे शेतात टाकून आता मात्र या शेतकऱ्यांना सारखे आभाळाकडे पाहून येरे येरे पावसाचा जप करण्याची वेळ निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकावर दोन-चार, आठ दिवसाच्या आत पाऊस पडला नाही, तर हे पेरलेली पिके करपल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा दुष्काळाचे सावट येण्याचे नाकारता येत नाही.
दुबार पेरणीचे संकट गडद
सोनाळा : सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोनाळा व परिसरात पेरणी केली होती; परंतु जवळपास २५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तरी संबंधित विभागाने या भागाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. सोनाळासह या आदिवासी खेडेगावात सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुरीची पेरणी केली, तर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती; परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील उगवणच झाली नाही, तर काही शेतकऱ्यांची पिके तासी लागली होती; परंतु पाऊस नसल्यामुळे पिके सुकली आहेत. जवळपास सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच आहे. बाळुभाऊ दाभाडे या शेतकऱ्याला १० एकर शेत पेरुन मोडावे लागले आहे.

पातुर्ड्यात पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट!
पातुर्डा : जून महिन्यात झालेल्या पावसावर विलंबून परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; मात्र पेरल्यानंतर जुलै महिन्यात आभाळमाया कोरडीच ठरली. गेल्या नऊ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पातुर्ड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यावर्षी पावसाने जूनमध्ये १२ दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेकांनी पेरण्या केल्या. तुरळक पावसावर काही शेती सावरली होती; मात्र पिकांच्या ऐन उभारीच्या वेळातच पावसाने नऊ दिवसांची दडी मारली. पावसाने दडी मारल्याने शेतीची कामगिरी ठप्प पडली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. ग्रामीण भागात दोन नक्षत्रांचे जोड, एकादशी, सोमवार असे हक्काचे पावसाचे ठोकताळ्यांचे दिवसही कोरडे जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढत आहेत.

पिकांची अवस्था अतिशय बिकट!
जामोद : जामोद आणि परिसरात मागील तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. यावर्षी सुरुवातीलाच पावसाळा चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला होता व मृग नक्षत्रात दोनदा पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या आशेपोटी जामोद परिसरात जवळपास ७५ टक्के पेरणी शेतकऱ्यांनी करुन घेतली; परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे पेरणी केलेली सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग, कपाशी पिके अक्षरश: करपून गेली आहेत, तर उर्वरित पेरणी खोळंबल्याने बळीराजा कासावीस झाला आहे. बरेचशा शेतकऱ्यांनी पाण्याअभावी करपलेल्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरविला आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे.

पावसाने डोळे वटारले, बळीराजा धास्तावला!
वडगाव वाण : वडगाव वाण व परिसरात गत तीन आठवड्यांपासून पावसाने डोळे वटारल्याने बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. सतत चार, पाच वर्षे अवर्षण, अवकाळी अतिवृष्टी याने त्याच्या पिकांचे नियोजन बिघडवून आर्थिक संकटे शेतकऱ्यासमोर उभी केल्याने पुन्हा जर वरुणराजा रुसला तर आता परिस्थिती अतिशय बिकट होणार असल्याचे शेतकरी चिंतातूर होऊन बोलत आहेत. काही जणांनी तर मागील पावसावर पेरले ते सोयाबीन मोडून काढावे लागल्याने दुबार पेरणीचे संकट आताच त्यांच्यासमोर उभे आहे, तर मान्सूनपूर्व कपाशी लागवड केलेले शेतकरी दररोज पिकाला पाणी देऊन देऊन बेजार होत आहेत व विनवणी करत आहेत, बा वरुणराजा आता तरी बरस रे, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी बांधवांना लागून आहे. पावसासाठी नवसही बोलल्या जात आहेत.

 

Web Title: Khamgaon surrounded the rain in the rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.