खामगाव तालुक्यात पीक कर्ज वाटप केवळ २५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:59 AM2020-07-15T11:59:03+5:302020-07-15T11:59:13+5:30
२३ जूनपासून रोजी केवळ १५ टक्के असलेले पीक कर्ज वाटप ११ जुलै रोजी केवळ २५ टक्के असल्याची माहिती आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खरिपातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची अंत्यत आवश्यकता असताना खामगाव तालुक्यात पीक कर्ज वाटपाची गती कमालीची मंदावली आहे. २३ जूनपासून रोजी केवळ १५ टक्के असलेले पीक कर्ज वाटप ११ जुलै रोजी केवळ २५ टक्के असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना पीक कर्ज तातडीने वाटप करण्याच्या सूचना दिल्यानंतरही हा प्रकार घडत आहे.
खामगाव तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचे चित्र पाहता शनिवारपर्यंत २१९०६ पैकी ५५१९ शेतकºयांनाच वाटप झाले आहे. महाआघाडी शासनाने दिलेल्या कर्जमाफीमध्ये कर्जमुदतीच्या कालावधीत बदल केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. त्या पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या खात्यांचे प्रमाणीकरण कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अडकले. तसेच थकीत शेतकºयांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा झाल्याशिवाय त्या शेतकºयाला कर्ज न देण्याचा पवित्रा बँकांनी घेतला.
त्यावर उपाय म्हणून प्रमाणीकरण रखडलेल्या शेतकºयांसाठी शासनाने सहकार विभागाकडून पीक कर्जाची हमी घेण्याचा उपाय योजला. त्यालाही बँकाकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता शासनाने ७ हजार कोटींपैकी जवळपास पाच हजार कोटींची रक्कम संबंधित जिल्हाधिकाºयांना दिली आहे. त्यानुसार बँकांनी पीक कर्ज वाटप गतीने करणे आवश्यक असताना खामगाव तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र बँकांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, खामगाव शहरासह ग्रामीण भागात असलेल्या बँकांच्या शाखांना प्रत्येकी १२६६ शेतकरी खातेदारांना कर्जवाटप करण्याचा लक्षांक आधी देण्यात आला. त्यामध्ये मोठाच घोळ झाल्याने पीक कर्ज वाटपाची टक्केवारी कमी असल्याचे आधी प्रशासनाला वाटले. त्यामुळे बँकांच्या लक्षांकामध्ये सुधारणा करण्यासाठीची बैठक खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी २४ जून रोजी घेतली होती. त्यावेळी बँकांच्या प्रतिनिधींनी नव्या लक्षांकानुसार पीक कर्ज वाटप करण्याचे ठरवण्यात आले. तरीही त्यामध्ये फारसा फरक पडला नसल्याचे चित्र कर्जवाटपाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.