खामगाव तालुक्यात 'पशुधन'चा कारभार प्रभारींच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:12 PM2020-12-12T17:12:02+5:302020-12-12T17:12:24+5:30
Khamgaon News तालुका पशुधन विकास ( विस्तार ) अधिकारी यांची बदली करण्यात आल्याने ही पदे रिक्त झाली आहेत.
- सचिन बोहरपी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरीअडगाव : तालुक्यातील कार्यरत पाच पशुधन विकास अधिकाऱ्यांसह पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास ( विस्तार ) अधिकारी यांची बदली करण्यात आल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. सद्य:स्थितीत या पदाचा कारभार अतिरिक्त प्रभारावरच सुरू आहे. बदली झालेल्या ठिकाणी नवीन पशुधन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.
तालुक्यात एकूण १४८ गावे असून, यापैकी १३२ आबाद, तर १६ उजाड गावे आहेत. १९वी पंचवार्षिक पशुगणना २०१२ नुसार तालुक्यात २ लाख ५ हजार पशुधन आहे. या पशुधनाच्या सेवेसाठी खामगाव येथे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पिंपळगावराजा, शिरला नेमाने, लाखनवाडा, पळशी बुद्रूक व बोथाकाजी येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, तर वर्णा, घारोड, गणेशपूर, बोरी अडगाव, बोरजवळा, कोलोरी व रामनगर येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ आहेत. सद्य:स्थितीत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय खामगाव पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. एच. बोहरा यांची पदोन्नतीने बदली झाल्याने हे पद रिक्त झाले या पदाचा अतिरिक्त प्रभार पशुधन पर्यवेक्षक डॉ. राजेश अवताळे सांभाळत आहेत.
त्यांच्याकडेच पिंपळगावराजा दवाखान्याचा प्रभारही देण्यात आला आहे. बोथाकाजी येथील दवाखान्याचा प्रभार बोरी अडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. संदीप मसने यांच्याकडे आहे. लाखनवाडा दवाखान्याचा प्रभार पळशी बु. येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांच्याकडे आहे.
शिरला नेमाने येथील दवाखान्याचा प्रभार कोलोरी येथे कार्यरत पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनील खोट्टे पाहत आहेत. पशु चिकित्सालय डॉक्टरविना रिकामे राहत असतील तर जनावरांचे उपचार कोण करणार? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे . त्यातच सद्य:स्थितीत पशुगणना सुरू झाली आहे.