खामगावचे तापमान चाळीशी पार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:20 PM2020-04-15T17:20:50+5:302020-04-15T17:20:59+5:30
संचारबंदीतच नागरिकांची उकाड्याने चांगलीच होरपळ होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: यंदाच्या उन्हाळ्यात सूर्याचा प्रकोप वाढता राहणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, गत तीन दिवसांपासून खामगाव शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. खामगावच्या तापमानाने चाळीशी पार केल्याने, संचारबंदीतच नागरिकांची उकाड्याने चांगलीच होरपळ होत असल्याचे चित्र आहे.
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मार्च महिन्यात काही दिवस थंडीसारखे वातावरण होते. मार्च अखेरीस तापमानाला सुरूवात झाली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, गत तिन दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी खामगावचे कमाल तापमान ४० अंश सेल्सीअस होते. मंगळवारी तापमानात किंचित वाढ झाली. मात्र, बुधवारी तापमान चक्क ४१ अंशावर पोहोचले. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने संचारबंदी घडी अडकलेल्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहरात दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्र लाट जाणवत असतानाच, रात्री उशीरा गारवा जाणवतो. वातावरणातील बदलाने आरोग्याच्या काही समस्या अनेकांना जाणवत आहेत. मात्र, कोरोना संचारबंदीमुळे नागरिक घरीच राहणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे.
गतवर्षीच्या तुलनेत २ अंश सेल्सीअने वाढ!
गतवर्षी १५ एप्रिल रोजी खामगाव शहराचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सीअस होते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ एप्रिल रोजी खामगाव शहराचे तापमान चक्क ४१ अंश सेल्सीअसवर पोहोचले आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. या उकाड्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.