खामगाव : ३१ पथविक्रेत्यांना दहा हजारांचे खेळते भांडवल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 03:23 PM2020-11-11T15:23:56+5:302020-11-11T15:24:04+5:30
अभियानातंर्गत ३१ जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएमएसव्हीए निधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची नगरपरिषद खामगाव दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत ३१ जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
या योजनेतंर्गत कर्जासाठी खामगाव नगर पालिका क्षेत्रातील १४५ फेरीवाले पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी खामगावातील तब्बल एक हजारापेक्षा जास्त फेरीवाल्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, बँकाचा प्रतिसाद अत्यल्प मिळत असल्याने फेरीवाल्यांची कर्ज वितरणाची प्रक्रीया संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे. पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतंर्गत पथविक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह रुपये दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवल बँकेतून तारण न घेता कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. कर्ज नियमित परतफेड केल्यास त्यांना ७ टक्के व्याज अनुदान प्राप्त होईल. तसेच पथविक्रेत्याने डिजिटल व्यवहार केल्यास विक्रेत्याला मासिक १०० रुपये पर्यंतचे कॅशबॅक सुविधा देण्यात येणार आहे.
आवश्यक असणारी कागदपत्रे
पथविक्रेत्यांचे आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्यांनी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे. किंवा सीएलएफ, चीएलसी, सीएससी केंद्राद्वारे आधार कार्ड, आधार कार्ड संलग्न मोबाइल क्रमांक, मतदानकार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्स (असल्यास), रेशन कार्ड, टी.सी., पॅन कार्ड, आधार लिंक बॅक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, इत्यादि आवश्यक कागदपत्रासहीत सीएफएफ, सीएलसी, सीएससी केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज सादर करावे.
आॅनलाइन नोंदणी
गुरूवार १२ नोव्हेंबर रोजी सीएसएसी सहकार्याने बाजारात कॅम्प लावून फेरीवाल्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे.ी फेरीवाले यांनी अर्ज भरून घ्यावे, व फेरीवाले यांनी जास्तीत जास्त अर्ज भरून, केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले आहे.